मुंबई बातम्या

मुंबई : कुत्रा-मांजर काही माणसे नाहीत, कुत्र्याला धडक देणाऱ्या स्वीगीच्या डिलिव्हरी बॉयला उच्च न्यायालयाचा दिलासा – Loksatta

गुन्हा रद्द करण्याचे आदेश देण्यासह पोलिसांना २० हजारांचा दंड

मुंबई : कुत्रा-मांजर काही माणसे नाहीत, अशी टिपण्णी उच्च न्यायालयाने केली. तसेच कुत्र्याला दुचाकीने धडक देणाऱ्या स्वीगीच्या घरोघरी अन्नपदार्थ पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्याला (डिलिव्हरी बॉय) उच्च न्यायालयाचा दिलासा दिला. त्याच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्याचे आदेश देतानाच न्यायालयाने याचिकाकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांना २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

बेदरकार आणि निष्काळजीपणे गाडी चालवण्याबाबतचे भारतीय दंड संहितेचे कलम हे अपघातातील पीडित हा प्राणी असल्यास त्याला लागू होऊ शकत नाही, असेही न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सदर निर्णय देताना प्रामुख्याने स्पष्ट केले. प्राणीप्रेमी त्यांच्या पाळीव कुत्र्यांना त्यांचे मूल किंवा कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवत असले तरी ती माणसे नाहीत. त्यामुळे आपल्यासमोरील प्रकरणात हे कलम लागू होऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

हेही वाचा >>> विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गुरुवारी पदभार स्वीकाराला

हा अपघात एप्रिल २०२० मध्ये झाला होता व मरिन ड्राइव्ह पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा आणि प्राणी क्रूरता प्रतिबंध कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे अपघात होऊन एखादी व्यक्ती जखमी झाली असेल किंवा अपघातात त्याचा मृत्यू झाला असल्यास भारतीय दंड संहितेचे संबंधित कलम लागू होते. कायदा एवढा स्पष्ट असताना पोलिसांनी कोणताही सारासार विचार न करता याप्रकरणी या कलमांतर्गत याचिकाकर्त्यावर गुन्हा दाखल केला. पोलीस हे कायद्याचे रक्षक आहेत. त्यामुळे त्यांनी गुन्हा दाखल करताना सजग असणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओढताना स्पष्ट केले.

हेही वाचा >>> महालक्ष्मी रेसकोर्सवर संकल्पना उद्यान साकारण्याच्या हालचालींना वेग

घटनेच्या दिवशी याचिकाकर्ता नेहमीप्रमाणे खाद्यपदार्थ वितरणासाठी दुचाकीवरून जात होता. त्यावेळी भटका कुत्रा अचानक त्याच्या दुचाकीसमोर आला. या अपघातात कुत्रा गंभीर जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी याचिकाकर्ताही दुचाकीवरून पडला. घटनेच्या वेळी भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ खाऊ घालण्यासाठी आलेल्या प्राणीप्रेमीने याचिकाकर्त्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी निष्काळजीपणाने गाडी चालवून कुत्र्याच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMilQFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL2RvZ3MtYW5kLWNhdHMtbm90LWh1bWFuLWJlaW5ncy1oaWdoLWNvdXJ0LWdyYW50cy1yZWxpZWYtc3dpZ2d5LWRlbGl2ZXJ5LWJveS1oaXQtZG9nLW11bWJhaS1wcmludC1uZXdzLXlzaC05NS0zMzc5MzM3L9IBmgFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL2RvZ3MtYW5kLWNhdHMtbm90LWh1bWFuLWJlaW5ncy1oaWdoLWNvdXJ0LWdyYW50cy1yZWxpZWYtc3dpZ2d5LWRlbGl2ZXJ5LWJveS1oaXQtZG9nLW11bWJhaS1wcmludC1uZXdzLXlzaC05NS0zMzc5MzM3L2xpdGUv?oc=5