मुंबई बातम्या

उच्च न्यायालयाचे प्रत्यक्ष कामकाज सुरू – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारपासून सुरू झालेल्या प्रत्यक्ष कामकाजाला वकिलांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. न्यायालयाने दोन शिफ्टमध्ये कामकाज केले. त्यात पहिल्या टप्प्यात अत्यंत महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी, तर दुपारच्या सत्रात जुन्या प्रलंबित याचिकांवरील सुनावणी करण्यात आली.

तब्बल आठ महिन्यांनंतर हायकोर्टाचे पूर्णकालीन कामकाज झाले. त्यामुळे न्यायालयात आलेल्या वकिलांमध्येही उत्साह होता. अनेक महिन्यांनी प्रत्यक्ष भेटीचा योग आल्याने न्यायालयाच्या इमारतीत वकिलांमध्ये आनंद दिसत होता. विशेषत: बंद पडलेले वकिलांचे कक्षही सुरू करण्यात आले होते. त्यामुळे त्या कक्षात बसून पुन्हा एकदा चर्चाच्या फैरी झडत असल्याचे चित्र होते. दरम्यान, करोनामुळे हायकोर्टातील काही वकिलांचाही मृत्यू झाला. त्यांच्या रिकाम्या खुर्च्या बघून अनेकांचे मन हेलावले. नेहमी सोबत असणारे सहकारी आता नाहीत, अशा भावनादेखील काही वकिलांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, प्रवेशद्वारावर प्रत्येक वकिलांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत होते. न्यायालय कक्षात एकावेळी केवळ तीन प्रकरणांच्या सुनावणीसाठी आवश्यक असणाऱ्या वकिलांनाच प्रवेश देण्यात येत होता. प्रत्येक कक्षात सुरक्षित वावराचे नियम पाळण्यात येत होते. तर न्यायालय कक्षातदेखील सॅनिटायजरची व्यवस्था केली होती. न्यायालय कक्षात वकील युक्तिवादासाठी उभे राहतात तिथे काच लावली आहे. मास्क लावूनच युक्तिवाद करणे बंधनकारक केले आहे. आगामी महिन्याभर अशाप्रकारे न्यायालयाचे प्रत्यक्ष कामकाज होणार आहे.

ऑनलाइनचीही सोय द्यावी

ज्येष्ठ वकिलांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून युक्तिवाद करणे कठीण ठरणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षसोबतच ऑनलाइन सुनावणीची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काही वकिलांनी केली आहे. ऑनलाइन सुनावणीसाठी आधीच अर्ज घ्यावेत, तसेच केवळ त्यांनाच लिंक पाठवावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/the-actual-proceedings-of-the-high-court-resumed-in-bombay-high-court-nagpur-bench-from-tuesday/articleshow/79514447.cms