मुंबई बातम्या

विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गुरुवारी पदभार स्वीकाराला – Loksatta

मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच विशेष पोलीस आयुक्त पद

मुंबई : विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गुरुवारी पदभार स्वीकाराला. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच विशेष पोलीस आयुक्त पद निर्माण करण्यात आले असून, या पदावर देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली होती. दैनिक ‘लोकसत्ता’ने याबाबतची बातमी सर्वप्रथम १४ डिसेंबरच्या अंकामध्ये प्रसिद्ध केली होती.

याबाबतचे आदेश बुधवारी गृहविभागाकडून जारी करण्यात आले. या आदेशात मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखालील सर्व सहपोलीस आयुक्तांच्या कामाचे संंनियंत्रण व पर्यवेक्षण विशेष पोलीस आयुक्त करतील, असे नमुद करण्यात आले आहे. देवेन भारती हे १९९४ च्या तुकडीतील पोलीस अधिकारी आहेत. यापूर्वी ते मुंबई पोलीस दलात सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आणि एटीएस प्रमुखपद अशा महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. ठाकरे सरकारमध्ये ३ सप्टेंबर २०२० रोजी देवेन भारती यांची एटीएसच्या प्रमुखपदावरून बदली करण्यात आली होती.

हेही वाचा >>> शौचालयाच्या टाकीत पडून महिला ठार, खाजगी सोसायटीतील घटना

अखेर सव्वामहिन्यांनंतर त्यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांची विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या होत्या. मुंबई पोलीस आयुक्त अखत्यारीतील पाचही सहपोलीस आयुक्तांच्या बदल्या करून या पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiiAFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL3NwZWNpYWwtY29tbWlzc2lvbmVyLW9mLXBvbGljZS1kZXZlbi1iaGFydGktYXNzdW1lZC1jaGFyZ2Utb24tdGh1cnNkYXktbXVtYmFpLXByaW50LW5ld3MteXNoLTk1LTMzNzkwNjIv0gGNAWh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvc3BlY2lhbC1jb21taXNzaW9uZXItb2YtcG9saWNlLWRldmVuLWJoYXJ0aS1hc3N1bWVkLWNoYXJnZS1vbi10aHVyc2RheS1tdW1iYWktcHJpbnQtbmV3cy15c2gtOTUtMzM3OTA2Mi9saXRlLw?oc=5