मुंबई बातम्या

गोखले ब्रीजसाठी ७ फेब्रुवारीला रेल्वे-पालिकेची बैठक – Sakal

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपालकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाचे काम मुंबई महानगरपालिकेकडून प्रगतिपथावर आहे.

मुंबई
sakal_logo

By

मुंबई – अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपालकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाचे काम मुंबई महानगरपालिकेकडून प्रगतिपथावर आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी आज पाहणी करून या कामाचा आढावा घेतला. या कामाला अधिकाधिक गती द्यावी तसेच यंदाच्या पावसाळ्यापूर्वी दोन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या कामाच्या निमित्ताने रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये बैठक येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत रेल्वे प्रशासन देखील त्यात सहभागी आहे. रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या पुलाच्या भागाचे पाडकाम मागील २ महिन्यात ८० मीटरपैकी ३० मीटर इतकेच रेल्वे कंत्राटदाराने पूर्ण केले आहे. रेल्वे पूल पूर्ण तोडून झाल्यानंतर महानगरपालिकेला उर्वरित कामाला वेग देता येणे शक्य होईल. त्या दृष्टीने कार्यवाही होण्यासाठी दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ रोजी महानगरपालिका आणि रेल्वे यांची संयुक्त बैठक मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

या उड्डाणपुलाच्या उत्तर बाजूकडील रस्त्याचे ७० टक्के काम महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. तर दक्षिणेकडील बाजू पुलाचे तोड काम करण्यासाठी रेल्वेला आवश्यक असल्याने अद्याप या भागाकडे काम सुरू करता आलेले नाही.

पुलाच्या पुनर्बांधणीसाठी महानगरपालिकेने सादर केलेल्या संकल्पना आराखड्याला रेल्वेने काल (दि. १) मंजुरी दिली आहे. या मंजूर आराखड्यानुसार ते काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. त्यादृष्टीने नियोजनासाठी रेल्वे प्रशासनासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे, जेणेकरून दिनांक ३१ मे २०२३ पर्यंत पुलाच्या दोन मार्गिका पूर्ण करून वाहतुकीसाठी खुल्या करता येणे शक्य होईल.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiV2h0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbXVtYmFpL211bWJhaS1nb2toYWxlLWJyaWRnZS1yYWlsd2F5LWFuZC1tdW5pY2lwYWwtbWVldGluZy1wanA3ONIBW2h0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vYW1wL211bWJhaS9tdW1iYWktZ29raGFsZS1icmlkZ2UtcmFpbHdheS1hbmQtbXVuaWNpcGFsLW1lZXRpbmctcGpwNzg?oc=5