मुंबई बातम्या

बॉम्बे टीनसमोर `चॅलेंज` वाढले – Sakal

बॉम्बे टीनसमोर `चॅलेंज` वाढले

मुंबई
sakal_logo

By

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : कोरोना आणि त्यानंतर वाढलेल्या महागाईने अनेकांचे कंबरडे मोडलेले असताना, मुंबईत गोरगरीब आबालवृद्धांना मोफत जेवण पुरविणाऱ्या ‘बॉम्बे टीन चॅलेंज’ संस्थेसमोर अनेक संकटे उभे केली आहेत. रोज साधारणपणे ४ हजारांत एकवेळच्या जेवणाची सोय केली जायची, तोच खर्च आता १० हजारांवर पोहोचला असल्याने सगळे गणिते जुळवणे कठीण बनल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
मुंबईतील गोरगरीब, रस्त्याशेजारी, उड्डाणपुलाखाली आणि अनेक प्रकारच्या नशेने व्याकुळ झालेल्यांना २५० हून अधिकांना बॉम्बे टीन चॅलेंजमागील १८ वर्षांपासून रोज जेवण पुरविते. यामध्ये पुलाखाली, रस्त्यावर असलेल्या पारधी समाजाच्या मुलांचाही समावेश असतो. मुंबई सेंट्रल येथील आरटीओ परिसर, रे रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक आदी पाच ठिकाणी बॉम्बे टीन चॅलेंज संस्थेकडून मोफत जेवण देत गोरगरीब, उपेक्षित असलेल्या नागरिकांची भूक शमवली जाते. कोरोनानंतर अनेक दानशूर व्यक्तींनीही हात आखडता घेतल्याने संस्था अगोदरच संकटात सापडलेली असताना, आता महागाईने हे संकट अधिक गडद झाल्याचे संस्थेचे केंद्र प्रमुख संदेश कदम म्हणाले.
अडीचशे नागरिकांच्या एकवेळच्या जेवणासाठी आम्हाला सुमारे ३ ते ४ हजार रुपयांच्या आत खर्च येत होता, आता तोच खर्च महागाईमुळे १० हजारांपर्यंत पोहोचला आहे. खाद्यतेल, तांदूळ, डाळी आणि प्रत्येक गोष्ट ही महाग झाली आहे. आमच्याकडे असलेल्या एका गाडीला जेवण पुरविण्यासाठी ७ हजारांचे डिझेल लागायचे, आता ते २० हजारांच्या घरात पोहोचले असून, त्यात स्वयंपाकाचा गॅसही महागल्याने गोरगरिबांना अन्न पुरविण्यासाठी आम्हाला मोठी कसरत करावी लागत असल्याचे कदम यांनी सांगितले.

नागपाड्यातून सुरुवात
नागपाडा पोलिस ठाणे परिसरात मागील १८ वर्षांपासून बॉम्बे टीन चॅलेंज संस्थेने मुंबईतील गोरगरीब आणि विशेषत: नशा केलेल्यांना जेवण पुरविण्यासाठीचा आणि त्यांना नशामुक्तीच्या मार्गाने नेण्यासाठीचा उपक्रम सुरू केला होता. आजही येथूनच जेवण तयार करून मुंबईभर पोहोचवले जाते.

तरुणांचे समुपदेशन
मुंबईत असंख्य तरुण हे नशेच्या आहारी जातात. अनेक तरुण हे श्रीमंत घरातीलही असतात, त्यांना जेवण मिळत नाही. ते उपाशीपोटी मृत्युमुखी पडतात. त्यामुळे त्यांनी जेवण देण्यापासून पुढे समुपदेशन करण्याचे कामही बॉम्बे टीन चॅलेंजकडून केले जाते. शिवाय पुढे बदलापूर येथे असलेल्या केंद्रात नशामुक्तीच्या मार्गावर येत असलेल्या तरुणांना कार्यक्रम दिला जात असून, त्यासाठी संस्थेचे प्रमुख के. के. देवराज यांचे मोठे योगदान राहिलेले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06118 Txt Mumbai

Source: https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mbi22b06118-txt-mumbai-20220507124419