मुंबई बातम्या

Mumbai Cruise Rave Party: क्रूझ गोव्यातून मुंबईत परतताच पुन्हा मोठी कारवाई; ‘ते’ फरार प्रवासी कोण? – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबी टीमचा पुन्हा छापा.
  • क्रूझ गोव्यातून मुंबईत परतताच मोठी कारवाई.
  • आणखी आठ जण ताब्यात; ड्रग्जचा साठा जप्त.

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या २० अधिकाऱ्यांच्या पथकाने आज सकाळी पुन्हा एकदा कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकल्याचे वृत्त असून या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईत आणखी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून क्रूझवरील सर्व प्रवाशांची यादी तयार करण्यात आली आहे. जे प्रवासी बुकिंग असूनही क्रूझवर आढळले नाहीत त्यांचा शोध सुरू असून दिल्ली, बेंगळुरू आणि गोवा येथे एनसीबीच्या पथकांकडून छापे टाकण्यात येत आहेत. ( Mumbai Cruise Rave Party Latest Update )

वाचा: आर्यनकडे ड्रग्जचा साठा व मोठी रोकड; अ‍ॅरेस्ट रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल येथून शनिवारी कॉर्डेलिया क्रूझ गोव्याला रवाना झाले होते. हे क्रूझ रवाना झाल्यानंतर काही वेळातच एनसीबीने मोठी कारवाई करत क्रूझवरील रेव्ह पार्टी उधळली होती. क्रूझवर प्रवासी बनून आधीपासूनच हजर असलेल्या एनसीबीच्या २२ अधिकाऱ्यांनी ही करवाई केली होती. या कारवाईत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट व मूनमून धामेचा या तिघांसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. या सर्वांना चौकशीनंतर रविवारी अटक करण्यात आली. यातील आर्यन याच्याकडे ड्रग्जचा साठा तसेच १ लाख ३३ हजार इतकी रोकड आढळून आली आहे. ही कारवाई सुरू असतानाच एनसीबीच्या पथकाने आज पुन्हा एकदा कॉर्डेलिया क्रूझवर धडक दिली आहे.

वाचा: ड्रग्ज पार्टी प्रकरणी मोठी कारवाई; शाहरुखच्या मुलासह तीन जणांना अटक

गोवा येथून आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास हे क्रूझ मुंबईत परतले. त्याचवेळी एनसीबीच्या २० अधिकाऱ्यांच्या टीमने क्रूजवर छापा टाकला. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. क्रूझवरील सर्व प्रवाशांची यादी एनसीबीने तयार केली असून त्यातील आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची नावे अद्याप हाती आलेली नाहीत. बुकिंगनुसार ज्या प्रवाशांची यादी तयार करण्यात आली आहे त्यातील काही जण प्रत्यक्षात क्रूझवर आढळून आलेले नाहीत. ते फरार असण्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली, बेंगळुरू आणि गोवा येथे छापे टाकण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

वाचा: ड्रग्ज पार्टी: आणखी पाच जणांना अटक; आर्यनची जामिनासाठी धडपड

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/after-busting-drugs-party-ncb-searches-cruise-ship-on-its-return-to-mumbai/articleshow/86752525.cms