मुंबई बातम्या

अरे देवा! मुंबई ‘या’ बाबतीत पडलीय सगळ्यात मागे; वाचा सविस्तर – Sakal

– मुंबई सदैव इतर शहरांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात असते.

मुंबई: आर्थिक व्यवहार असोत, व्यापार असो किंवा शिक्षण असो… मुंबई सदैव इतरांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात असते. पण व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीत एक वेगळी गोष्ट घडलेली पाहायला मिळाली. ITI चे प्रवेश 15 जुलैला सुरू झाले. त्यानंतर जवळपास बारा दिवसांनी राज्यभरातील तब्बल 61 हजार 726 विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली. यामध्ये सर्वात कमी नोंदणी मुंबईची असून आतापर्यंत केवळ 650 विद्यार्थ्यांनीच यात नोंदणी केल्याचे दिसले आहे. त्यामुळे मुंबई परिसरात असलेल्या ITI मध्ये यंदा जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: सहनशक्ती संपली; प्रवासी संघटनेचे आता विनातिकीट लोकल प्रवास आंदोलन

राज्यातील 417 शासकीय आणि 549 खाजगी आयटीआयमध्ये एकुण 1 लाख 48 हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्या जागांवरील प्रवेशासाठी संचालनालयाकडून नोंदणी प्रक्रिया 15 जुलै पासून सुरू करण्यात आली आहे.संचालनालयाच्या संकेतस्थळावर आजपर्यंत 3 लाख 32 हजार 218 विद्यार्थ्यानी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली, त्यात आपली माहिती ही 69 हजार 959 जणांनी भरली असून त्यापैकी 61 हजार 726 विद्यार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये मुंबईत केवळ 650 जणांचे अर्ज पूर्ण भरून झाले असून ही संख्या राज्यातील इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.

मुंबईत जागा रिक्त राहण्याची शक्यता

मुंबई परिसरात 13 शासकीय आणि 14हून अधिक खाजगी संस्थाकडून चालविण्यात येणाऱ्या आयटीआय कार्यरत आहेत. यामध्ये सुमारे 4 हजाराहून अधिक जागा असताना मागील 11 दिवसात येथील प्रवेशासाठी केवळ 650 जणांनी नोंदणी पूर्ण केली असल्याने मुंबईत मोठ्या प्रमाणात आयटीआय च्या जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: मुंबईत डेल्टाप्लस व्हेरियंटचा धोका वाढतोय, आणखी दोघांना संसर्ग!

काही शहरांतील विद्यार्थ्यांची नोंदणी

शहर अर्ज नोंदणी पूर्ण अर्ज

मुंबई – 6410. 787. 650

ठाणे 10105. 2609. 2301

रायगड. 7004. 2016. 1850

पालघर 6114. 1153. 1043

रत्नागिरी 4498. 1223. 1098

पुणे 15856. 3454. 3079

नागपूर. 14495. 2162. 1876

औरंगाबाद 12022. 2740. 2361

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-lags-behind-for-iti-admission-registration-as-only-650-students-completed-the-procedure-vjb-91