मुंबई बातम्या

मुंबईकरांनो, घरातच राहा! उद्या मेट्रो दिवसभर बंद – Maharashtra Times

मुंबईकरांनो, घरातच राहा! उद्या मेट्रो दिवसभर बंद
मुंबई: ‘करोना’च्या संकटाशी लढण्यासाठी महत्त्वाचं पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून रविवारी, मुंबई मेट्रोची सेवा बंद राहणार आहे. मेट्रो प्रशासनानं ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.

Live: अनेक विमानांची उड्डाणे रद्द, गो एअरची सेवा उद्या बंद

मुंबईकरांनी घरातच राहावे व पंतप्रधानांनी जाहीर केलेला जनता कर्फ्यू यशस्वी व्हावा, या उद्देशानं मुंबई मेट्रोची घाटकोपर-वर्सोवा सेवा रविवारी संपूर्ण दिवस बंद राहणार आहे. ‘कोविड १९’ लढण्याचा हा एक प्रयत्न आहे,’ असं मेट्रोच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. #HaveANiceDay असं हॅशटॅगही ट्विटसोबत करण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द

मध्य रेल्वेनं रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला असून एकूण क्षमतेच्या ६० टक्के लोकल गाड्याच मुंबईत चालवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गर्दी टाळणं हा करोना रोखण्याचा सर्वात प्रभावी उपाय असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं राज्यभरात त्या दृष्टीनं उपाययोजना केल्या जात आहेत. गावोगावच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील प्रमुख देवस्थानांनीही दर्शनासाठी मंदिरं बंद ठेवली आहेत. राज्य सरकारनं पहिली ते आठवीच्या परीक्षा थेट रद्द करून शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील काही मोठी शहरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अर्थात, त्यातून सार्वजनिक वाहतुकीस वगळण्यात आलं आहे. मुंबई मेट्रोनं मात्र स्वत:हून सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा: चाकरमान्यांनो, गावाला येऊ नका: नीतेश राणे

दरम्यान, करोना व्हायरसमुळं राज्यात निर्माण झालेलं संकट अधिक गहिरं होताना दिसत आहे. राज्यातील करोना रुग्णांचा कालपर्यंत ५२ असलेला आकडा आज थेट ११ ने वाढून ६३ वर पोहोचला आहे. यात मुंबईतील दहा तर पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

वाचा: ‘फडणवीसांनी करोना विषाणू गिळला असता का?’

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/metro-service-in-mumbai-to-remain-suspended-on-sunday-in-support-of-janata-curfew/articleshow/74744912.cms