मुंबई बातम्या

गूड न्यूज; सामना सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्ससाठी आली आनंदाची बातमी, पाहा नेमकं काय घडलं… – Maharashtra Times

मुंबई : मुंबईचा आजचा सामना हा चेन्नई सुपर किंग्सबरोबर होणार आहे. पण हा सामान सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
नेमकं घडलं तरी काय, पाहा…
मुंबईचा आजचा आयपीएलमधील सातवा सामना आहे आणि आतापर्यंत त्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे हा महत्वाचा सामना सुरु होण्यापूर्वी मुंबईच्या संघासाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. मुंबई इंडियन्सचा संघ हा रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांच्यावर जास्तकरून अवलंबून असतो. या दोघांसाठी आता एक सर्वात मोठी बातमी आली आहे. क्रिकेट विश्वात विस्डन हा एक मानाचा पुरस्कार समजला जातो. प्रत्येक वर्षी विस्डन जगभरातील खेळाडूंचा सन्मान करते. विस्डन यावर्षी पाच खेळाडूंचा सन्मान करणार आहे आणि त्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांचा समावेश करण्यात आला आहे. विस्डनने यावर्षी पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या पाच खेळाडूंमध्ये रोहित, बुमरा यांच्यासह डेव्हॉन कॉनवे, ऑली रॉबिनसन आणि डॅन व्हॅन निकर्क यांचा समावेश करण्यात आला आहे.
आतापर्यंत सहाही सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा सातवा सामना महत्वाचा असेल. त्यामुळे या सामन्यापूर्वी आलेल्या या आनंदाच्या बातमीने रोहित आणि बुमरा यांना अधिक बळ मिळू शकते. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये रोहितला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहितकडून आतापर्यंत मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही. त्याचबरोबर बुमरा हा निष्णात गोलंदाज असला तरी त्याला आतापर्यंच्या आयपीएलमध्ये आपील छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे या पुरस्कारामुळे जर या दोघांच्या कामगिरीवर चांगला परीणाम झाला तर मुंबई इंडियन्ससाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट असेल. त्यामुळे या पुरस्कारानंतर रोहित आणि बुमरा यांच्या कामगिरीमध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळतो का, याची उत्सुकता आता सर्वांनाच असेल. त्यामुळेच आजच्या सामन्यात क्रिकेट जगतातील सर्व चाहत्यांचे लक्ष रोहित आणि बुमरा यांच्या कामगिरीवर लागलेले असेल.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt22/news/good-news-for-mumbai-indians-before-match-between-mi-vs-csk-know-what-exactly-happened/articleshow/90981116.cms