मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेतील ट्रेचिंग निविदेतील घोटाळ्याची चौकशी करा, भाजपाची महापालिका आयुक्तांकडे मागणी – Lokmat

मुंबई – मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या ट्रेचिंग निविदेत सत्ताधारी शिवसेनेने  प्रशासनाच्या मदतीने १०० कोटींचा भ्रष्टाचार केला असून या निविदा तातडीने रद्द करून यातील घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा यांनी केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पालिकेतील भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे, प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक भालचंद्र शिरसाट, महापालिकेतील पक्ष नेते विनोद मिश्रा,  प्रविण छेडा आदी या प्रसंगी उपस्थित होते.

कोटेचा यांनी सांगितले की, महापालिकेतील पक्ष नेते विनोद मिश्रा यांनी महापालिका आयुक्तांना २८ ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून ट्रेचिंग निविदेत सत्ताधारी शिवसेनेच्या मदतीने काही कंत्राटदार संगनमताने घोटाळे करतील तसेच या निविदांच्या अटी व शर्ती बदलल्या जातील असे कळविले होते. १७ नोव्हेंबर रोजीही मिश्रा यांनी आयुक्तांना पुन्हा पत्र पाठवून निविदा प्रक्रियेतील संभाव्य घोटाळ्यांची पूर्वसूचना दिली होती. कंत्राटदारांकडून आपसात संगनमत करून कोणत्या दरांमध्ये निविदा भरली जाईल याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला होता. १८ नोव्हेंबर रोजी निविदा सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर मिश्रा यांनी आयुक्तांना दिलेली माहिती खरी होती हेच सिद्ध झाले.

मिश्रा यांनी आयुक्तांना पत्र पाठवूनही महापालिका प्रशासनाने निविदेत घोटाळे होऊ नयेत यासाठीची प्रतिबंधात्मक दक्षता घेतली नाही. २६ ऑगस्ट रोजी ट्रेचिंगच्या याच कामाची निविदा प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी पाच कंत्राटदारांनी या निविदेत  ३८० कोटींची बोली सादर केली होती. मात्र १८ नोव्हेंबर रोजी ५६९ कोटींची निविदा प्रसिद्ध झाली आहे. अवघ्या ३ महिन्यात निविदा रकमेत एवढी मोठी वाढ झाली आहे. या घोटाळ्याची पालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी आ. कोटेचा यांनी यावेळी केली.

एका ‘डीजे’ मालकाने या निविदेसाठी १०० कोटींची सुपारी घेतली असल्याचा आरोप विनोद मिश्रा यांनी यावेळी केला. या निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांवर पालिकेची फसवणूक केल्याबद्दल एफआयआर दाखल करावा तसेच या या कंत्राटदारांचे मोबाईल वरील संभाषण, व्हाटस अप चॅट तसेच या मंडळींच्या विलेपार्ले येथील हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीचे सीटीव्हीही चित्रीकरण मिळवावे आदी मागण्याही मिश्रा यांनी केल्या.

Web Title: Investigate the scam in Mumbai Municipal Corporation’s treaching tender, BJP’s demand to the Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://www.lokmat.com/mumbai/investigate-scam-mumbai-municipal-corporations-treaching-tender-bjps-demand-municipal-commissioner-a301/