मुंबई बातम्या

नागपूर- नाशिक- मुंबई हायस्पीडला चालना मिळणार – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

केंद्र सरकारने मुंबई-नागपूर हाय स्पीड ट्रेनसाठी राज्य सरकारकडे जमीन मागताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेच सहमती दर्शवल्याने प्रकल्पासाठी पहिले सकारात्मक पाऊल पडले. आता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नागपूर-नाशिक-मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉर प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पाची जागा, व्यवहार्यता आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे.

राज्याकडून रस्ते विकास महामंडळाने मार्ग निर्धारित करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. ‘एनएचएसआरसीएल’ने हायस्पीड कॉरिडॉरसाठी समृद्धी महामार्गालगतच्या जागेचा प्रस्ताव दिला. अप आणि डाऊन ट्रेनसाठी १७.५ मीटर रुंद जागेची आवश्यकता आहे. समृद्धीच्या शेजारी हायस्पीडची ८० टक्के व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे काही ठिकाणी अतिरिक्त जमीन लागणार असल्याने भूसंपादन करावे लागेल. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ‘सुपर एक्स्प्रेस कम्युनिकेशन वे’ अर्थात बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच महामार्गाची पाहणी करून नागपूर ते शिर्डीपर्यंतचा मार्ग येत्या डिसेंबरपर्यंत सुरू होण्याची ग्वाही दिली. या मार्गाला लागून हाय स्पीड ट्रेन धावावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला, हे विशेष. प्रकल्पाची आवश्यक कामे तातडीने सुरू करावी, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात व्यक्त केली. प्रकल्पाचा तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अहवाल करण्यास एक वर्ष लागेल आणि प्रत्यक्षात योजनेला कार्यान्वित करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागण्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/nagpur-nashik-mumbai-high-speed-will-get-a-boost/articleshow/86671791.cms