मुंबई बातम्या

काळजी घ्या! मुंबईत आता व्हायरल तापाचा जोर – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी

मुंबई : करोना संसर्गाच्या काळामध्ये प्रत्येक ताप हा करोना संसर्गाचा ताप आहे असे समजून धास्ती घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे अन् ते सातत्याने वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून करोनाची चाचणी ताप आल्यानंतर करायलाच हवी, मात्र चाचणी निगेटिव्ह आली तर हा ताप व्हायरल प्रकारचा आहे का, याचीही खात्री वैद्यकीय तपासणीमध्ये करायला हवी याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे.

वाचा: ‘महाराष्ट्राशी समोरासमोर लढण्याची हिंमत नाही म्हणून हे सगळं चाललंय’

फिजिशिअन डॉ. एम. जी. मोता यांनी सांगितले, ‘करोना संसर्गाची साथ असली तरीही प्रत्येक ताप हा करोनाचा ताप आहे, असे समजून घाबरू नये. व्हायरल प्रकारच्या तापामध्ये करोना संसर्गामध्ये दिसतात, तशी लक्षणे दिसतात. हा ताप चार ते पाच दिवस राहू शकतो. त्यामुळे योग्य निदान, लक्षणांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, वैद्यकीय सल्ल्याने आरटीपीसीआर चाचण्याही करणे गरजेचे आहे.’ तापमानामध्ये झालेला बदल, वाढता उष्मा यामुळे अंगावर पुरळ येणे, मूत्रविसर्जनामध्ये त्रास होणे, मूत्रमार्गातील संसर्ग अशाही तक्रारी आहेत. प्रत्येक वर्षी उष्म्याची सुरुवात होत असताना ताप येत असल्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढते. मागील दोन वर्षांपासून करोना संसर्गामुळे साध्या तापाचीही धास्ती घेतली जाते. संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आर. एस. मोरे यांनी, ‘काही रुग्णांचा ताप हा दोन ते तीन दिवसांमध्ये कमी होतो, त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्याही निगेटिव्ह येतात, काही रुग्णांनी दोनवेळाही या चाचण्या केल्या आहेत, तरीही त्यांचे अहवाल निगेटिव्ह येतात. करोना नाही याची आरटीपीसीआर चाचण्यांच्याद्वारे निश्चित खात्री करून घेतली तर तापाचे निदान करणे अधिक सोपे जाते’, याकडे लक्ष वेधले.

…तरीही वेगळे राहा

अंगात कणकण, अंगदुखी, ताप येणे, सर्दी अशी लक्षणे दिसल्यास त्वरित इतरांपासून स्वतःला वेगळे करा. जोपर्यंत तापाचे निश्चित निदान होत नाही, तोपर्यंत कुटुंबासोबतचा थेट संपर्क टाळा. आलेला ताप हा करोनाचा ताप नाही हे निदान झाल्यानंतरही खबरदारीचा उपाय म्हणून काळजी घ्या, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे.

वाचा: भारतीय समुद्रात अमेरिकी युद्धनौकेची घुसखोरी

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/viral-fever-cases-on-the-rise-in-mumbai/articleshow/81999057.cms