मुंबई बातम्या

Mumbai Local Train Update : नव्या वर्षात मुंबई लोकल धावणार का? आरोग्य मंत्री म्हणतात… – TV9 Marathi

लोकल ट्रेनबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)  यांनी मोठं विधान केलं आहे (Rajesh Tope on Mumbai Local train)

मुंबई : लोकल ट्रेनबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)  यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या नव्या वर्षात कोरोनाची स्थिती बघून लोकलबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. अनलॉकच्या काही टप्प्यांमध्ये आतापर्यंत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि महिलांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, सर्वांसाठी लोकल कधी सुरु होणार? हा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जातोय. त्याचपार्श्वभूमीवर राजेश टोपे यांचं वक्तव्य महत्त्वाचं आहे (Rajesh Tope on Mumbai Local train).

“नव्या वर्षात कोरोना रुग्णांची संख्या काय आहे ते आम्ही बघणार आहोत. जर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली नाही तर लोकल ट्रेनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्कीच सकारात्मक विचार करतील. आम्हाला ठावूक आहे की, लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे. सध्या सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पण याबाबत लवकरच निर्णय घेऊ”, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली (Rajesh Tope on Mumbai Local train).

गेल्या आठ महिन्यांपासून लोकलला रेड सिग्नल

गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली मुंबईकरांची लाईफलाईन 15 डिसेंबरनंतर सुरु होण्याच्या निर्णयाला पुन्हा एकदा खो मिळाला होता. “कोरोनाचा धोका पाहता येत्या डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्येवर पालिका प्रशासनाची नजर ठेवली जाणार. यानंतरच लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकारला कळवले जाईल”, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली होती. त्यामुळे नव्या वर्षात लोकल सर्वासांठी सुरु होईल, अशी सर्वसामान्यांची आशा आहे.

दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यानंतर मुंबई महापालिका कोरोनाला हरवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली. मुंबईत कोव्हिड नियंत्रणात आला आहे. मात्र, डिसेंबर महिन्यापासून चाचण्या झालेल्या व्यक्तींपैकी केवळ 5 टक्के रुग्णांना कोव्हिडची बाधा झाल्याचे आढळत आहे. मात्र, तरीही कोव्हिड पूर्णपणे संपलेला नाही.

“येत्या 20 डिसेंबरपर्यंत कोव्हिड परिस्थितीचा अंदाज घेण्यात येईल. तसेच, नाताळ आणि नववर्षाचा विचार करुन लोकल सुरु करण्याबाबत विचार करु,” अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली होती.

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली नसली तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले होते. मे आणि जून महिन्यात चाचणी झालेल्यांपैकी 38 टक्के रुग्ण कोरोनाबाधित आढळत होते. मात्र, आता 5 डिसेंबरपासून हे प्रमाण 5 टक्क्यांवर आले आहे. पुढील काही दिवस कोरोनाच्या आकडेवारी नजर असणार आहे, असंही त्यांनी सांगतिलं होतं.

हेही वाचा : जिवाची पर्वा न करता लोकलसमोर उतरून प्रवाशाला वाचवले; अमळनेरच्या रणरागिणीचा गुलाबराव पाटलांकडून सत्कार

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/rajesh-tope-on-mumbai-local-train-latest-update-358665.html