मुंबई बातम्या

मुंबईत ‘वंदे भारत’चा डबल धमाका; मुंबईकरांच्या दिमतीला दोन एक्स्प्रेस होणार दाखल – महाराष्ट्र टाइम्स

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजवण्याच्या हालचाली सुरू असतानाच विकासकामांतून मतपेरणीला वेग आला आहे. मुंबई मेट्रोच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत एक्स्प्रेसला झेंडा दाखवणार आहेत. या गाडीतून प्रवास करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांच्या दिमतीला दोन एक्स्प्रेस दाखल होणार आहेत. अशाप्रकारे तीन ‘वंदे भारत’ धावणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. राज्यातील पहिली गाडी पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते गांधीनगरदरम्यान धावली होती.

पंतप्रधान मोदी फेब्रुवारीत मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते साईनगर शिर्डी आणि सोलापूर (सिद्धेश्वर मंदिर) या धर्मिक स्थळांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. १० फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता पंतप्रधानांनी झेंडा दाखवल्यावर उद्घाटनीय फेरी सीएसएमटी येथून शिर्डीसाठी आणि सोलापूरवरून मुंबईसाठी रवाना करण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे.

प्रवास वेळेत सव्वातासाची बचत

नियमित वेळापत्रकानुसार, मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटीहून दुपारी ४.१० ला सुटेल आणि सोलापूरला रात्री १०.४० ला पोहोचेल. सीएसएमटीहून बुधवार तर सोलापूरहून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस ही एक्स्प्रेस धावणार आहे. सिद्धेश्वर एक्स्प्रेसने मुंबई-सोलापूर हे अंतर पार करण्यासाठी सुमारे सात तास ५५ मिनिटे लागतात. ‘वंदे भारत’ने हा प्रवास सहा तास ३० मिनिटांत पूर्ण होईल.

थांबे : दादर, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डवाडी.

घाटातून धावणार ‘वंदे भारत’

मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस नियमितपणे सीएसएमटीहून सकाळी ६.१५ला रवाना होणार असून, शिर्डीत दुपारी १२.१०ला पोहोचेल. परतीचा प्रवास सायंकाळी ५.२५ला सुरू होईल आणि मुंबईत रात्री ११.१८ला संपेल. सध्या धावत असलेल्या शिर्डी एक्स्प्रेसला सहा तासांचा अवधी लागतो. नव्या गाडीने पाच तास ५५ मिनिटांत प्रवास पूर्ण होईल. मंगळवार वगळता उर्वरित दिवस शिर्डी ‘वंदे भारत’ धावेल. कसारा घाटातून ही गाडी धावणार आहे.

थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड.

‘वंदे भारत’ची वैशिष्ट्ये

– १२९ सेकंदात १६० किमी प्रतितास वेग

– १६ डबे. १,१२८ प्रवासी आसन क्षमता

– अग्निशमन व रोधक यंत्रणा

– आरामदायी आसने, डब्यात सीसीटीव्ही, टॉकबॅक यंत्रणा

– किंमत : ११० कोटी

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMijQFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL21haGFyYXNodHJhLXdpbGwtYmUtZmlyc3Qtc3RhdGUtdG8tcnVuLXRocmVlLXZhbmRlLWJoYXJhdC10cmFpbi9hcnRpY2xlc2hvdy85NzQyODQyMS5jbXPSAZEBaHR0cHM6Ly9tYWhhcmFzaHRyYXRpbWVzLmNvbS9tYWhhcmFzaHRyYS9tdW1iYWktbmV3cy9tYWhhcmFzaHRyYS13aWxsLWJlLWZpcnN0LXN0YXRlLXRvLXJ1bi10aHJlZS12YW5kZS1iaGFyYXQtdHJhaW4vYW1wX2FydGljbGVzaG93Lzk3NDI4NDIxLmNtcw?oc=5