मुंबई बातम्या

Mumbai Farmers Morcha: मुंबईतील शेतकरी मोर्चाकडे शिवसेनेनं पाठ का फिरवली? – Maharashtra Times

‌म. टा. प्रतिनिधी, मुंबई

शेतकरी हिताच्या विरोधातील कायदे केंद्र सरकारने तातडीने रद्द करावे, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या राज्याच्या विविध भागांतील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी अथवा राजभवनावर निघालेल्या मोर्चात शिवसेनेचा एकही मोठा नेता फिरकला नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नैतिक पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी संयुक्त शेतकरी कृती समितीच्या नेत्यांना सांगितले होते. तथापि, शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांनी त्या आंदोलनाकडे पाठ फिरवली असल्याचे बोलले जाते.

वाचा: ‘कृषी कायदे येण्याआधीच अदानींना गोदामवाटप’

संयुक्त शेतकरी कृती समितीने सोमवारी राजभवनावर भव्य मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी तो मेट्रो सिनेमाजवळ अडवला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गोव्यात असल्यामुळे ते आंदोलकांच्या शिष्टमंडळाला भेटणार नाहीत, असे स्पष्ट झाल्यानंतर आंदोलक नेत्यांनी संताप व्यक्त केला. तत्पूर्वी आझाद मैदानात झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, समाजवादी पार्टीचे नेते अबु असीम आझमी, शेकापचे नेते आ. जयंत पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदी सहभागी झाले. मात्र, शिवसेनेचा एकही मंत्री या मोर्चात फिरकला नाही. शिवसेनेचा एकही मोठा नेता आंदोलनात दिसला नाही.

वाचा: अर्णव गोस्वामी अडकणार; पार्थो दासगुप्तानं कोर्टात दिला ‘हा’ जबाब

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे या मोर्चात सहभागी होतील, असे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र, कल्याण शहरातील पत्री पुलाच्या उद्घाटनाला गेल्यामुळे आदित्य ठाकरे मोर्चाला येऊ शकले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत किमान कृषिमंत्री दादा भुसे किंवा अन्य कुणी ज्येष्ठ मंत्री मोर्चात सहभागी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, तीही फोल ठरली. शिवसेनेने नावापुरते राहुल लोंढे नावाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याला शिवसेना प्रतिनिधी म्हणून पाठवले होते.

वाचा: मुंबईत पुढचा महापौर काँग्रेसचाच; ‘या’ नेत्याचा दावा

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/not-single-shivsena-leader-attend-mumbai-farmers-protest-to-opposed-farm-laws-2020/articleshow/80460071.cms