मुंबई बातम्या

Mumbai : उपनगरांतील पथदिव्यांचे एलई़डीकरण पूर्ण; अदानी इलेक्ट्रिसिटीला ५५ कोटी अदा – महाराष्ट्र टाइम्स

मुंबई : पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील रस्ते आणि पदपथावरील पारंपरिक सोडियम व्हेपरचे पथदिवे बदलून तेथे एलइडी दिवे बसविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आत्तापर्यंत ९६. ६९ टक्के काम झाले असून त्यापोटी अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीला ५५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम अदा करण्यात आली आहे. जुने दिवे भंगारात विकून त्यातून मिळालेले पैसे वगळून हे पैसे देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयानुसार विद्युत ऊर्जा बचतीसाठी एलइडी दिवे बसविण्याची योजना अंमलात येत आहे. मुंबई शहरात बेस्ट, पूर्व आणि पश्चिम उपनगरांत अदानी कंपनी तर कांजूरमार्ग ते ठाणे व अन्य ठिकाणी महावितरणमार्फत दिवेबदलाचे काम केले जाते आहे. चार वर्षांपासून सुरू असलेला हा प्रकल्प पूर्ण होत आला आहे. एलइडी दिव्यांमुळे वीज बिलात मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचे पालिकेने म्हटले आहे. मुंबईतील एलइडी दिवे बसविण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या १७ जानेवारी २०१८ रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

संबंधित उपयोगिता संस्थांमार्फत हे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या भांडवली खर्चाच्या अनुदानाकरिता विद्युत कंपनीने मागणीपत्र तयार करून पालिकेस सादर केले होते. त्यानंतर प्रत्येक टप्प्याकरिता आवश्यक असलेल्या भांडवली खर्चाच्या १० टक्के रक्कम आगाऊ देण्यात आली व उर्वरीत रक्कम त्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर देण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या प्रस्तावात देण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात एलइडी रूपांतर

दिवे : १७ हजार

खर्च : १२ कोटी ६९ लाख

दुसऱ्या टप्प्यातील काम

दिवे : ६४ हजार ६५६

खर्च : ४२ कोटी ४७ लाख

पूर्व/पश्चिम उपनगरांत एकूण पथदिवे

८७ हजार ३४७

एलइडी रूपांतर

८४ हजार ४५७

रूपांतर शिल्लक काम

२८९०

एकूण अदा : ५५ कोटी रुपये

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMimgFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL2luc3RhbGxhdGlvbi1vZi1sZWQtbGlnaHRzLWluLWVhc3Rlcm4tYW5kLXdlc3Rlcm4tc3VidXJicy1pcy1hbG1vc3QtY29tcGxldGUvYXJ0aWNsZXNob3cvOTc0MDg4NjcuY21z0gGeAWh0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpLW5ld3MvaW5zdGFsbGF0aW9uLW9mLWxlZC1saWdodHMtaW4tZWFzdGVybi1hbmQtd2VzdGVybi1zdWJ1cmJzLWlzLWFsbW9zdC1jb21wbGV0ZS9hbXBfYXJ0aWNsZXNob3cvOTc0MDg4NjcuY21z?oc=5