मुंबई बातम्या

पुरुषाचं जगणं सोपं की बाईंचं; चार राण्यांची गोष्ट सांगणारा ‘ बॉम्बे बेगम्स’ – Sakal

मुंबई – जेव्हा बॉम्बे बेगम्स प्रदर्शित होणार होती त्यावेळी असं कुणाला वाटलं नव्हतं की ती किती बोल़्ड वेबसीरिज असणार आहे. त्याचा अंदाज कुणाला आला नाही हे मान्य करावे लागेल. गेल्या काही दिवसांपूर्वी या मालिकेवर बंदी घालावी अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्याचे कारण म्हणजे त्या मालिकेत एक अल्पवयीन मुलगी मादक पदार्थांचे सेवन करताना दाखवली गेली आहे. मालिका पाहताना ती गोष्ट काही लक्षात येत नाही. बॉम्बे बेगम्स कमालीची हॉट सीरिज आहे. तिचा विषयही सहजासहजी पचनी पडणारा नाही. पुरुषाचं जगणं सोपं की बाईचं हा गहन प्रश्न मालिकेत हाताळण्यात आला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून गुंफलेली कथा. संवाद, प्रभावी आहेत. जे प्रेक्षकाला विचार करण्यास भाग पाडतात. ती केवळ उपभोगाची वस्तु नाही. तिलाही काही स्वप्न आहेत, आदर्श आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे तिला तिचं मत आहे. हे या मालिकेत सारखं अधोरेखित होतं.

गेल्या वर्षी ब-याच महिलाप्रधान मालिका प्रदर्शित झाल्या होत्या. उदाहरण म्हणून काही नावं सांगायची झाल्यास त्यात फोर मोअर शॉटस, मेड इन हेवन, याशिवाय डॉली किट्टी और वो चमकते सितारे सारख्या चित्रपटाचे नाव घेता येईल. आता त्यात बॉम्बे बेगम्सच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. केवळ स्रियांवर आधारित तिचा विषय आहे म्हणून नव्हे तर ज्या पध्दतीनं तो मांडण्यात आला आहे त्यासाठी या मालिकेचं कौतूक करावं लागेल. नेटफ्लिक्सनं तयार केलेल्या सहा भागांच्या या मालिकेत चार जणींची गोष्ट सांगण्यात आली आहे. त्या चार जणी मुंबईत राहणा-या आहेत. तिथे काम करतात. या सगळ्यांमध्ये जी सर्वात श्रीमंत आहे तिचं नाव राणी असं आहे. राणी प्रचंड महत्वकांक्षी आहे. ती एका बँकेची चेअरमन आहे. त्यामुळे तिला चांगली प्रतिष्ठा आहे. मान आहे. पण हे सगळं बाहेर, घरात तिला कुणीही विचारत नाही. त्यामुळे तिला काही करुन त्यांच्या नजरेत चांगले दिसायचे आहे. त्यासाठी ती प्रयत्नशील असते.

[embedded content]

आयशा नावाची एक करिअरला महत्व देणारी मुलगी आहे. जी इंदोर वरुन मुंबईमध्ये नशीब आजमावण्यास आली आहे. मात्र तिच्या आयुष्यात अशा काही घडामोडी होतात की तिला स्व ची वेगळीच ओळख यावेळी होते. तिची ओळख लिली नावाच्या एका डान्सबार मधील मुलीशी  होते. आयशाची भूमिका सर्वात गोंधळात टाकणारी आहे. आयशा नेहमी हे चूक की ते बरोबर या चक्रात सापडलेली दिसते. यात आणखी एक महत्वाची भूमिका वठवणारी व्यक्तिरेखा आहे ती शाईनची. राणीची सावत्र मुलगी. तिला चित्र काढण्याचा छंद आहे. एकप्रकारे तिच या मालिकेची निवेदिका दाखवली आहे. आपल्या वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून महिलांच्या आयुष्यातील शाश्वत सत्य ती रेखाटत असते.

[embedded content]

ज्या पध्दतीनं बॉम्बे बेगम्सची मांडणी केली आहे ती प्रभावी आहे. मालिकेची पटकथा सुंदरपणे लिहिण्यात आली आहे. मालिकेच्या माध्यमातून वर्कप्लेस हॅरेशमेंट्स, मी टू सारख्या प्रकारांना त्यात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे मालिकेतील भूमिकेच्या प्रेमात कधी पडलो असा प्रश्न आपण स्वतला विचारायला लागतो. पूजा भट्ट, शहाना गोस्वामी, अमृता सुभाष आणि प्लाबिता बोरठाकुर यांचा अभिनय सुंदर झाला आहे. दुसरीकडे विवेक गोम्बर, दानिश हुसैन, इमान शाह, राहुल बोस आणि प्रशांत सिंह यांचाही अभिनय लक्षवेधी आहे. यासगळ्यात मनीष चौधरी यांचा अभिनय चांगला झाला आहे.

‘व्हायरस’ पिच्छा सोडेना; रँचोपाठोपाठ फरहानलाही कोरोना

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते?’ मालिकेतील ‘यश’ची सख्खी बहीण आहे ही लोकप्रिय अभिनेत्री

ज्यांना वेगळ्या प्रकारचा ज़ॉनर पाहण्याची सवय आहे, आवड आहे त्यांच्यासाठी ही मालिका आगळी पर्वणी ठरेल यात शंका नाही. चार राण्या, त्यांचं विश्व, पुरुषप्रधान संस्कृतीत जगण्यासाठी करावा लागणारा प्रयत्न यामुळे होणार शोषण असे काही गंभीर मुद्दे मालिकेच्या निमित्तानं पुन्हा एकदा पुढे आले आहेत. आतापर्यत त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद या मालिकेला मिळाल्याचे दिसून आले आहे. काहींना ही मालिका आंबट प्रकारातील वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र त्या पलीकडे जाऊन विचार करता आला तर हाताशी काही लागेल असे मालिकेतून सुचित होते. 
 

Source: https://www.esakal.com/manoranjan/web-series-movie-review-bombay-begums-review-netflix-puja-bhatt-amruta-subhash-423347