मुंबई बातम्या

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सीएसएमटी पुनर्विकासाची पायाभरणी १९ जानेवारीला – Loksatta

ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकासाची पायाभरणी १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यावेळी त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणीही करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यासाठीचा प्रस्ताव मध्य रेल्वेने केंद्राकडे पाठवला होता. पुनर्विकासाचा एकूण खर्च एक हजार ८१३ कोटी रुपये आहे.

हेही वाचा >>> पंतप्रधान मोदींच्या शासकीय समारंभांचा राजकीय वापर? विरोधकांचा आक्षेप

मुंबईतील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणांपैकी एक अशा सीएसएमटी रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करुन चेहरा मोहरा बदलण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वे लॅण्ड डेव्हलपमेन्ट ऑथोरिटी (आरएलडीए), मध्य रेल्वेच्या सहकार्याने सीएसएमची स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार असून या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सप्टेंबर २०२२ च्या अखेरीस झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदाबाद, नवी दिल्लीसह सीएसएमटी स्थानकांच्या पुनर्विकास कामांसाठी एकूण दहा हजार कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजुरी देण्यात आली होती. हा पुनर्विकास प्रकल्प अडीच वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.

सीएसएमटी स्थानक पुनर्विकासाची ठळक वैशिष्टय

– एकूण ३६ हेक्टर जागेत पुनर्विकास

– सर्व प्रवासी विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी एकाच ठिकाणी येतील असे काॅनकोर्स. यामध्ये कॅफेटेरिया, स्टाॅल्ससह मनोरंजनाच्या सुविधा असतील. इमारतीच्या सर्व बाजूंना आणि सर्व फलाटांना हा जोडलेला असेल.

– प्रत्येकी १२ मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल

– एका स्कायवाॅकची जोड या पुलाला देणार

– एकापेक्षा जास्त प्रवेशाची आणि सर्व बाजूंनी स्थानकावर प्रवेश करण्याची सोय, आगमन, निर्गमनात बदल

– पुरेशा पार्किंग सुविधांची तरतूद करणे

– मेट्रोची जोड

– सीएसएमटीतील फलाटांवर आकर्षक छत

– दिव्यांगजन प्रवाशांसाठी सुविधा, स्थानकातील रोषणाईत बदल, नवीन मार्गदर्शक चिन्ह

– सीसी टीव्ही कॅमेरे, प्रवेश नियंत्रणाची तरतूद

– सौरऊर्जा, जलसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन

चौकट

सीएसएमटी पुनर्विकासात नामवंत कंपन्यांची रुची

सीएसएमटी स्थानक पुनर्विकास प्रकल्प राबविण्यासाठीसाठी टाटा, एल ॲण्ड टी प्रो.लि., जे.के.इन्फ्रा प्रो.लि यासह नामवंत कंपन्या इच्छुक आहेत. रेल्वे लॅण्ड डेव्हलपमेन्ट ऑथोरिटीतर्फे (आरएलडीए) निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असून फेब्रुवारी २०२३ ला निविदा उघडण्यात येणार आहेत.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMijwFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL3BtLW5hcmVuZHJhLW1vZGktbGF5LXRoZS1mb3VuZGF0aW9uLXN0b25lLW9mLWNzbXQtcmVkZXZlbG9wbWVudC1vbi1qYW51YXJ5LTE5LW11bWJhaS1wcmludC1uZXdzLXp3cy03MC0zNDA1MjczL9IBlAFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL3BtLW5hcmVuZHJhLW1vZGktbGF5LXRoZS1mb3VuZGF0aW9uLXN0b25lLW9mLWNzbXQtcmVkZXZlbG9wbWVudC1vbi1qYW51YXJ5LTE5LW11bWJhaS1wcmludC1uZXdzLXp3cy03MC0zNDA1MjczL2xpdGUv?oc=5