मुंबई बातम्या

कोटीच्या कोटी उड्डाणे; दोन दिवसांसाठी मुंबईत आलेल्या योगींनी ५ लाख कोटींची गुंतवणूक यूपीला नेली – Maharashtra Times

मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले असून या दौऱ्यादरम्यान गुरुवारी त्यांनी मुंबईतील बँकर्स, आघाडीचे उद्योगपती, अभिनेते आणि निर्मात्यांसोबत चर्चा केली. उत्तर प्रदेशात होणाऱ्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेसाठी उद्योगपतींना निमंत्रण देण्यासाठी योगी मुंबईत आले होते. तर या दोन दिवसांच्या दौऱ्यात योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशमध्ये ५ लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने याबाबत माहिती दिली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी मुंबईत मुकेश अंबानी यांच्यासह देशातील प्रमुख उद्योजकांची भेट घेतली. त्यानंतर उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय की, रिलायन्स समूहाने राज्यभरात 5G तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याचा आणि उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे.

वाचाः मस्तच! ठाणे ते बोरीवली अवघ्या २० मिनिटांत, ‘या’ नव्या पर्यायामुळं आता ट्रॅफिकचं नो टेन्शन

रिलायन्सप्रमाणेच अदानी समुहानेही उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. अदानी समूहाने एनसीआरमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारीत वैद्यकीय महाविद्यालय आणि नोएडामध्ये १०,००० तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, असं राज्य सरकारने म्हटलं आहे.

वाचाः पतीला सोडून प्रियकरासोबत राहू लागली, अन् त्यानेच विश्वासघात केला; महिलेसोबत घडलं भयंकर

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने यापूर्वी अनेकदा ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे आयोजन केले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कारकिर्दीतील ही पहिलीच जागतिक गुंतवणूकदार परिषद असेल. या परिषदेकरिता १७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक उत्तर प्रदेशात येण्याची शक्यता आहे. योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील आघाडीच्या उद्योगपतींना उत्तर प्रदेशच्या विकासात भागीदार होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी यावेळी कोटक महिंद्राचे सीईओ उदय कोटक, एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा, एसआयडीबीआयचे शिव सुब्रह्मण्यम रमण यांच्यासारख्या बँकर्सचा समावेश होता. त्यानंतर त्यांनी आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला, हिरानंदानी समूहाचे सहसंस्थापक डॉ. निरंजन हिरानंदानी, जेएसडब्ल्यू समूहाचे एमडी आणि अध्यक्ष सज्जन जिंदाल, पिरामल ग्रूपचे अध्यक्ष अजय पिरामल यांच्याशी चर्चा केली. अदानी समूहाचे करण अदानी, अंबानी समूहाचे मुकेश अंबानी यांचीदेखील त्यांनी भेट घेतली.

वाचाः योगीजी तुम्हाला उद्या दिल्लीत झेप घ्यायचेय, महाराष्ट्रातील फुटकळ भाजप नेत्यांचा सल्ला ऐकू नका: सामना

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMilwFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL3lvZ2ktYWRpdHlhbmF0aC1tdW1iYWktdmlzaXQtc2VjdXJlcy01LWxha2gtY3JvcmUtdXAtaW52ZXN0bWVudC1wcm9wb3NhbHMvYXJ0aWNsZXNob3cvOTY3Nzg5NjguY21z0gGbAWh0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpLW5ld3MveW9naS1hZGl0eWFuYXRoLW11bWJhaS12aXNpdC1zZWN1cmVzLTUtbGFraC1jcm9yZS11cC1pbnZlc3RtZW50LXByb3Bvc2Fscy9hbXBfYXJ0aWNsZXNob3cvOTY3Nzg5NjguY21z?oc=5