मुंबई बातम्या

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पीपीई किटसचा भ्रष्टाचार; मनसेचा आरोप – Zee २४ तास

मुंबई: कोरोनाच्या संकटकाळात मुंबई महानगरपालिकेकडून पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटस (पीपीई) किटसचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. बाजारपेठेत ६०० रुपयांना मिळणाऱ्या पीपीई किटसाठी मुंबई महानगरपालिका ८१२ रुपये मोजत आहे. महापालिकेचे अधिकारी यामधून मलिदा खात आहेत. हा म्हणजे मेलेल्याच्या टाळुवरंच लोणी खाण्याचा प्रकार असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.  
एकीकडे मुख्यमंत्री फेसबुकवरून फक्त गोड बोलतात. राजकारण करु नका, असा सल्ला देतात. मग त्यांना भ्रष्टाचार चालतो का, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला. 

सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार; किरीट सोमय्यांची ICMRकडे तक्रार

मुंबई महानगपालिकेतील या अधिकाऱ्यांविरोधात सध्या आम्ही आंदोलन करु शकत नाही. मात्र, त्यांनी भ्रष्टाचार थांबवला नाही तर या अधिकाऱ्यांना रस्त्यावर काढून चपलेने मारू, अशा इशारा देशपांडे यांनी दिला. 
याशिवाय, संदीप देशपांडे यांनी वरळी पॅटर्नवरही टीकास्त्र सोडले आहे. जिथे रुग्णांची संख्या वाढत आहे, तिथे कसला आला वरळी पॅटर्न? वरळीत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या कोरोना टेस्टही केल्या जात नाहीत. लक्षण असल्याशिवाय त्यांच्या टेस्ट केल्या जाणार नाहीत, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असल्याची माहिती  संदीप देशपांडे यांनी दिली.

सरकारचा मोठा निर्णय; महालक्ष्मी रेसकोर्सवर १५ दिवसांत कोरोना केअर सेंटर उभारणार

मुंबईत बुधवारी कोरोनाचे ७६९ नवे रुग्ण आढळून आले. तर २५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०,५२७ इतका झाला आहे. मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाचे ६८ नवे रुग्ण आढळून आले. धारावीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा ७३३ इतका झाला आहे. याशिवाय, दादर आणि माहीम परिसरातील रुग्णांचा आकडाही वाढत आहे

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/ppe-kits-scam-in-mumbai-bmc-says-mns-007/519221