मुंबई बातम्या

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा – Loksatta

मुंबई : मोफत आणि उत्तम आरोग्य सुविधा मिळत असल्यामुळे मुंबई व आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये पचारासाठी येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांना बाहेरील औषधांच्या दुकानातून दामदुप्पट दरात औषधे खरेदी करावी लागत आहेत. तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणारी ब्लेड आणि अनेक उपकरणेही रुग्णांच्या नातेवाईकांना विकत आणावी लागत आहेत. परिणामी, रुग्णांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

हेही वाचा >>> विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गुरुवारी पदभार स्वीकाराला

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये अद्ययावत आरोग्य सुविधा आणि मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे गरीबांचा उपचारासाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयाकडे कल अधिक असतो. महानगरपालिकेच्या केईएम, शीव आणि नायर रुग्णालयांमध्ये दररोज चार ते पाच हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येतात. मात्र मागील काही दिवसांपासून या रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत, परंतु औषधे, वैद्यकीय उपकरणे रुग्णांनाच विकत आणावी लागत आहेत. डॉक्टरांनी रुग्णांना लिहून दिलेली औषधेसुद्धा रुग्णालयात मिळत नाहीत. शस्त्रक्रियेसाठी लागणारे ब्लेड, जेलको, आयव्ही आदी आवश्यक असणारी औषधे व उपकरणे रुग्णांना विकत आणावी लागत आहेत. या औषधांसाठी साधारणपणे पाच ते दहा हजार रुपये खर्च येत असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. रुग्णालयातील औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रुग्णांची अवस्था ‘उपचारापेक्षा औषध जालीम’ अशी झाली आहे.

हेही वाचा >>> मध्य रेल्वेवरील जलद लोकल मंदावली

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी २०२२ – २३ या आर्थिक वर्षाच्या अल्पसंकल्पात आरोग्य विभागासाठी ६९३३.७५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातून औषधे, वैद्यकीय साहित्य, अद्ययावत उपकरणे, रुग्णालय इमारतीची डागडुजी आदी सुविधा पुरवणे अपेक्षित आहे. मात्र रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना औषधे मिळत नसल्याने बाहेरील औषधांच्या दुकानातून औषध खरेदी करावे लागत आहे.

याबाबत आपल्याला कल्पना नाही. परंतु सर्व रुग्णालयातील औषधांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेऊन, तातडीने कार्यवाही करण्यात येईल.

– संजीव कुमार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे), मुंबई महानगरपालिका

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMigQFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL3Nob3J0YWdlLW9mLW1lZGljaW5lcy1pbi1tdW1iYWktbXVuaWNpcGFsLWNvcnBvcmF0aW9uLWhvc3BpdGFscy1tdW1iYWktcHJpbnQtbmV3cy15c2gtOTUtMzM3OTI3My_SAYYBaHR0cHM6Ly93d3cubG9rc2F0dGEuY29tL211bWJhaS9zaG9ydGFnZS1vZi1tZWRpY2luZXMtaW4tbXVtYmFpLW11bmljaXBhbC1jb3Jwb3JhdGlvbi1ob3NwaXRhbHMtbXVtYmFpLXByaW50LW5ld3MteXNoLTk1LTMzNzkyNzMvbGl0ZS8?oc=5