मुंबई बातम्या

नव्या वेगवान वाटा!मुंबईतील सुसाट प्रवासाची सुरुवात; नवे स्थानक, नवा मार्ग – Maharashtra Times

सुसाट प्रवासाची सुरुवातनितीन चव्हाण

मुंबईतील अरुंद रस्ते, रस्त्यांवर वाहनांची दुतर्फा पार्किंग, दररोज शेकडो नवीन वाहनांची भर यामुळे शहर ते उपनगरात सर्वत्र वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी पूर्व मुक्त मार्गाच्या धर्तीवर सागरी किनारी मार्ग (कोस्टल रोड) बांधण्यात येतो आहे. मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडमुळे मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. वरळीत दोन वर्षांपासून पिलरवरून सुरू असलेला वाद नुकताच मिटला. या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील जवळपास ६८ ते ७० टक्के काम पूर्ण झाले असून नवीन वर्षात डिसेंबरपर्यंत हा रस्ता खुला होईल.

प्रियदर्शनी पार्क ते कांदिवली ३५ किमीचा प्रकल्प

खर्च सुमारे १२ हजार ७२१ कोटी

पहिल्या टप्प्यात मरीन ड्राईव्ह ते वरळी १०.६ किमी.

ऑक्टोबर २०१८ मध्ये कामाचा शुभारंभ

प्रकल्पात २.०७ किमीचे दोन महाकाय बोगदे होत असून एका बोगद्याचे काम १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण तर दुसरा बोगदा २.०७ मीटरचा असून हे काम जानेवारीत पूर्ण होण्याची शक्यता.

पर्यावरणस्नेही प्रकल्प

या प्रकल्पामुळे ३४ टक्के इंधनाची तर ७० टक्के वेळेची बचत होईल. शिवाय, कोस्टल रोडमध्ये ७० हेक्टर एवढे हरित क्षेत्र उपलब्ध होईल. त्यामुळे हा प्रकल्प पर्यावणस्नेही ठरणार आहे.

………

पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा जोडरस्ता

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) हा पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा जोडरस्ता ठरणार आहे. या रस्त्याने गोरेगाव ते मुलुंड हे अंतर वीस मिनिटांत गाठता येईल. ऐरोली मार्गे नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरेल. प्रकल्पात विविध उड्डाणपूल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून भुयारी मार्ग आहेत. प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.

जोडरस्त्याची लांबी १२.२ किमी

पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगाव पूर्व येथील ओबेरोय मॉल ते पूर्व द्रुतगती मार्ग, मुलुंड पूर्व येथील ऐरोली नाका चौकापर्यंत हा रस्ता जाणार आहे.

खर्च : आठ हजार कोटी

नॅशनल पार्कमधून बोगदा

हा रस्ता ५ बाय ५ मार्गिकांचा असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून बोगद्यातून जाणार आहे. यामध्ये ४.७ किमी लांबीच्या व १३ मीटर व्यासाच्या जोडबोगद्याचा आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरातून जाणाऱ्या १.६० किमी लांबीचा पेटी बोगदा आणि पोहोच रस्त्यांच्या बांधकामाचा समावेश आहे. हे बोगदे ३×३ मार्गिकेचे आहेत.

रुंदीकरण व उड्डाणपूल

गोरेगाव बाजूकडील ओबेराय मॉल ते फिल्म सिटी या २.८ किमी लांबीच्या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम चालू आहे. मुलुंड बाजूकडील ‘तानसा पाईप लाईन’ ते ‘पूर्व द्रुतगती मार्ग जंक्शन’ पर्यंतच्या २.७ किमी रस्त्याचे रुंदीकरण आणि नाहूर रेल्वे उड्डाणपुलाचे रुंदीकरण सुरू आहे. ही कामे सन २०२३ मध्ये संपतील.

एमटीएचएल

दक्षिण मुंबईतून नवी मुंबईत आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर थेट अर्ध्या तासात पोहोचणारा मार्ग मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) रोड या वर्षात सप्टेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

लांबी : २१.८० किमी

खर्च : १७ हजार ८४३ कोटी रू.

प्रकल्पाची स्थिती : ९० टक्के पूर्ण

मुदत : सप्टेंबर २०२३

—-

शिवडी-वरळी कनेक्टर

पश्चिम उपनगरातील किनारपट्टीवरून न्हावाशेवा आणि एमटीएचएल गाठण्याची संधी. हा मार्ग ऑक्टोबर २०२३ मध्ये पुरा होणार नसला तरी एमटीएचएलच्या दृष्टीने तो महत्त्वाचा भाग असेल. वरळी ते शिवडी व पुढे न्हावाशेवासाठीचा मार्ग विना अडथळा अर्धा तास ते ३५ मिनिटांत पार होईल.

लांबी : ४.५ किमी

खर्च : ११०० कोटी

सद्यस्थिती : ३० टक्के कामे पूर्ण

मुदत : जानेवारी २०२४

नरिमन पॉइंट-कुलाबा कनेक्टर

दक्षिण मुंबईतील दोन टोकांना जोडण्यासाठी नरिमन पॉइंट ते कुलाबा, असा चार किमी संपूर्ण मार्ग समुद्रावरून उभारला जात आहे.

लांबी : १.७ किमी

खर्च : ३१५ कोटी

सद्यस्थिती : निविदा निघाल्या.

वांद्रे-वर्सोवा सी लिंक

वांद्रे वर्सोवा प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. समुद्रातून जाणाऱ्या या सागरी सेतूची जोडणी वांद्रे वरळी सी लिंक आणि भविष्यातील वर्सोवा विरार सी लिंकला दिली जाईल.

लांबी : १७.७ किमी

खर्च : ११ हजार कोटी.

मुदत : डिसेंबर २०२६

—-

विरार-अलिबाग कॉरिडॉर

एमएसआरडीसी विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर प्रकल्प हाती घेणार आहे. पहिल्या टप्प्यात नवघर ते चिरनेर हा ९८.५ किमीचा मार्ग उभारला जाईल. या जमीन अधिग्रहणाचे काम एक ते दोन महिन्यात सुरू होईल. ५५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित.

——

वर्सोवा विरार सी लिंक

दक्षिण मुंबईकरांना गुजरातशी जोडणी देण्यासाठी वर्सोवा-विरार सागरी सेतू मार्ग महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे नरिमन पॉइंट येथून निघालेला प्रवासी सागरी मार्गांवरून थेट मुंबईबाहेर विरारला राष्ट्रीय महामार्गांवर पोहोचेल. वाहतूक कोंडीतून या प्रवाशांची सुटका होईल. वर्सोवा ते विरार असा ४२.७ किमी लांबीचा सागरी मार्ग उभारला जाईल. त्यासाठी ५० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. समुद्रातून एक किलोमीटर आतमधून हा मार्ग जाईल. नुकताच हा प्रकल्प राज्य सरकारने एमएसआरडीसीकडून एमएमआरडीएकडे हस्तांतरित केला.

…………

ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग

बोरिवली ते ठाणे हा दीड तासांचा प्रवास १५ ते २० मिनिटांवर आणणाऱ्या या भुयारी मार्गाच्या कामाला येत्या वर्षात एमएमआरडीए सुरुवात करेल. हा मार्ग ११.८ किलोमीटर लांबीचा असेल. यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून १०.२५ किमी लांबीचा बोगदा जाईल. याला ७ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत.

…………………..

मेट्रो २ अ

उत्तर मुंबईला पूर्वेकडील उपनगरांशी जोडणारी मार्गिका २ अ व मेट्रो २ बी आहे. मेट्रो २ अ ही मार्गिका दहिसर ते अंधेरी पश्चिमेकडील डीएन नगरपर्यंत आहे. यापैकी दहिसर ते डहाणूकरवाडी मार्गिका सुरू झाली आहे. मार्गिकेच्या पुढील टप्प्याची भेट जानेवारीत मिळेल.

लांबी : १८.६ किमी

स्थानके : १७

पहिला टप्पा एप्रिलमध्ये सुरू (नऊ स्थानके सेवेत दाखल)

दुसरा टप्पा जानेवारीत सुरू होणार (आठ स्थानके)

मेट्रो २ ब

‘मेट्रो २अ’ला डीएन नगर येथील ईएसआयसी वसाहतीपासून ते थेट मंडालेपर्यंत संलग्नता देण्यासाठी मेट्रो २ ब मार्गिका असेल. या मेट्रो मार्गिकेची रखडलेली कामे पुन्हा जोमाने सुरू झाली. ऑक्टोबर २०२३ मध्ये ही मेट्रो सुरू होणार होती. मात्र, आता पहिला टप्पा डिसेंबर २०२४ मध्ये सुरू होईल

लांबी : २३.६ किमी.

स्थानके : २२

खर्च : १० हजार ९८६ कोटी

सद्यस्थिती : २९ टक्के काम पूर्ण

मुदत : पहिला टप्पा डिसेंबर २०२४.

दुसरा टप्पा डीएन नगर ते नॅशनल कॉलेज, जून २०२५.

पहिली भूमिगत मेट्रो

राज्यातील पहिला भूमिगत मार्ग मेट्रो ३ च्या रुपात यंदा डिसेंबरात सेवेत येईल. सर्व २७ स्थानकांची उभारणी जोमाने सुरू आहे. पहिला टप्पा आरे ते बीकेसी उत्तर, हा यंदा तयार होत आहे. तर बीकेसी दक्षिण ते कफ परेड, ही मार्गिका २०२४ मध्ये सुरू होईल. मुंबईला पश्चिमेकडून उत्तर-दक्षिण जोडणारी ही महत्त्वाची मार्गिका असेल.

लांबी : ३३.५० किमी

स्थानके : २७

खर्च : ३७ हजार कोटी

सद्यस्थिती : ७७ टक्के कामे पूर्ण

मुदत : पहिला टप्पा १७ स्थानके-डिसेंबर २०२३,

दुसरा टप्पा १० स्थानके-डिसेंबर २०२४

मेट्रो ७

दहिसर ते अंधेरीजवळ गुंदवलीपर्यंत ही मार्गिका असेल. यापैकी दहिसर ते आरे मार्ग एप्रिलमध्येच सुरू झाला. उर्वरित मार्गिकेची भेट जानेवारीत मिळेल.

लांबी : १६.५ किमी

स्थानके : १३

खर्च : ६२०८ कोटी

मुदत : पहिला टप्पा एप्रिलमध्ये सुरू (नऊ स्थानके), दुसरा टप्पा जानेवारीत.

—-

मेट्रो ७ अ

मेट्रो ७ ला विमानतळाशी जोडण्यासाठी ही मेट्रो महत्त्वपूर्ण. विमानतळ वसाहत ते विमानतळासाठी ‘मेट्रो ७ अ’ ही मार्गिका असेल. त्याचे काम यंदा पुढे जाईल.

लांबी : ४ किमी

स्थानके : दोन

प्रकल्पाची स्थिती : १० टक्के कामे पूर्ण

मुदत : डिसेंबर २०२५

—-

मेट्रो ४

वडाळा ते कासारवडवली प्रकल्पाला विलंब झाला आहे. या मेट्रोमुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होईल.

लांबी : ३२.३ किमी

स्थानके : ३२

खर्च : १४,५४९ कोटी

सद्यस्थिती : ४२.५ टक्के काम पूर्ण

मुदत : पहिला टप्पा डिसेंबर २०२४ (कापूरबावडी ते जेव्हीएलआर),

दुसरा टप्पा डिसेंबर २०२५ (जेव्हीएलआर ते वडाळा)

मेट्रो ५

ठाण्याला भिवंडी, कल्याणला जोडण्यासाठी मेट्रो ५ मार्गिका. जमीन अधिग्रहणातील अडचणींमुळे दुसऱ्या टप्प्याचे काम अडकलेले

लांबी : २४.९ किमी

खर्च : आठ हजार ४१६ कोटी

सद्यस्थिती : पहिल्या टप्प्याचे ७२ टक्के काम पूर्ण

मुदत : पहिला टप्पा डिसेंबर २०२४ (कापूरबावडी ते धामणकर नाका)

मेट्रो ६

स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ मार्गिका पूर्व आणि पश्चिम उपनगराला थेट जोडणी देणार आहे. मात्र, या मार्गिकेच्या कारशेडच्या जागेचा तिढा कायम आहे.

लांबी : १४.४ किमी (१३ स्थानके)

स्थानके : १३

खर्च : ६,७१६ कोटी

सद्यस्थिती : ६३ टक्के काम पूर्णा्र

मुदत : डिसेंबर २०२४

मेट्रो ९

या दहिसर ते मीरा भाईंदर मार्गिकेमुळे मीरा भाईंदरपासून प्रवाशांना विमानतळापर्यंत येता येईल. या मेट्रोचे कारशेड राई-मुर्धे गावात उभारले जाणार होते. स्थानिकांच्या विरोधामुळे आता कारशेड उत्तन येथे सरकारी जमिनीवर होत आहे. त्यातून या मेट्रोची लांबी चार किमीने वाढणार असून खर्चही वाढेल.

लांबी : १६ किमी

स्थानके : ८

खर्च : ६६०७ कोटी

सद्यस्थिती : ४७ टक्के कामे पूर्ण

पहिल्या टप्पा डिसेंबर २०२४ (दहिसर ते काशिगाव),

दुसरा टप्पा जून २०२५

……………………….

नवे स्थानक, नवा मार्ग विस्तार

महेश चेमटे

महामुंबईकरांच्या दिमतीला नवे स्थानक अर्थात दिघा रेल्वे स्थानक आणि बेलापूर-खारकोपर मार्गाचा पुढील टप्पा लोकसेवेत अल्पावधीत दाखल होईल. यामुळे मुंबई उपनगरी रेल्वेची हद्द वाढेल. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मुंबई शहरी परिवहन प्रकल्प-३ (एमयूटीपी -३) मध्ये नवीन कळवा-ऐरोली उन्नत मार्गाचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात दिघा रेल्वे स्थानक पहिल्या तिमाहीत सुरू होईल. यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना नवे स्थानक मिळेल. हार्बर मार्गावर बेलापूर/नेरुळ ते उरण असा रेल्वे प्रकल्प आहे. मध्य रेल्वे-सिडको यांच्या समन्वयाने हा प्रकल्प होईल. यामुळे हार्बर मार्गावरील लोकलची धाव थेट उरणपर्यंत जाईल. भविष्यात नवी मुंबईत विमानतळ होणार आहे. पहिला टप्पा म्हणजे बेलापूर/ नेरुळ ते खारकोपर हा टप्पा पूर्ण झाला असून या मार्गावर गाड्या धावत आहेत. उर्वरित, खारकोपर ते उरण (दुसरा टप्पा) काम पूर्ण झाले असून शेवटची पाहणी सुरू आहे. सिडकोशी झाल्यानंतर या प्रकल्पाचे लोकार्पण होईल.

………..

बेलापूर/नेरुळ-उरण लोकल मार्ग

प्रकल्प खर्च : २,९८० कोटी

प्रकल्प मंजूर : मार्च १९९६

एकूण लांबी : २६.७ किमी

पहिला टप्पा : बेलापूर/नेरुळ – खारकोपर – १२.४ किमी (कार्यान्वित)

दुसरा टप्पा : खारकोपर ते उरण – १४.३ किमी (लोकार्पण लवकरच)

……

दिघा रेल्वे स्थानक

नोव्हेंबर २०१६ मध्ये १० हजार ९४७ कोटींच्या एमयूटीपी ३ या प्रकल्प संचाला मंजुरी

कळवा-ऐरोलो उन्नत प्रकल्प एकूण खर्च : ४७६ कोटी

पहिला टप्पा : दिघा रेल्वे स्थानक, पहिला टप्पा सद्यस्थिती : काम ९२ टक्के पूर्ण

स्थानक खर्च : १५० कोटी, दुसरा टप्पा : संपूर्ण उन्नत मार्ग, सद्यस्थिती : भूसंपादन अपेक्षित. मुदत : भूसंपादनानंतर ३६ महिने

…………………………..

महानगरातील महास्वप्ने

विमानतळ, मेट्रो रेल्वे, बुलेट ट्रेन, सागरी मार्ग, फनिक्युलर रेल्वे असे अनेक प्रकल्प ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांच्या महानगर क्षेत्रात म्हणजेच मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सध्या सुरू आहेत. आजपासून सुरू होत असलेल्या नव्या वर्षात यातील काही प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. या योजनांमुळे ठाणे जिल्ह्यातील तसेच नवी मुंबई, पनवेल, मिराभाईंदर, वसईविरार क्षेत्रातील वाहतुकीचा नकाशा बदलेल.

कोपरी पुलाने मुंबई-ठाणे-नाशिक जलद

मुंबई-ठाण्याच्या वेशीवरील अरुंद कोपरी पुलाचे काम २०१८ पासून सुरू असून २०२१ मध्ये या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. जुन्या पुलाच्या दुतर्फा प्रत्येकी दोन मार्गिकांचे दोन पूल उभारण्यात आले असून त्यावर वाहतूक वळवून मधल्या जुन्या पुलाचे काम सुरू करण्यात आले. एमएमआरडीए आणि रेल्वे प्राधिकरणाकडून ही कामे सुरू असून दुसऱ्या टप्प्यातील गर्डर उभारणीचे काम चालू आहे. या वर्षांत पुलाचे काम पूर्ण होईल. कोपरी पुलामुळे पुर्वद्रुतगती महामार्गावरून ये-जा करणाऱ्या आठ मार्गिकांसाठी नवा आठ मार्गिकांचा पूल झाल्यावर मुंबई ते ठाणे व पुढे नाशिकपर्यंतच्या वाहतुकीचा वेग वाढेल.

कळवा पुलाची कोंडी दूर

कळवा खाडीवरील दोन पुलांपैकी एक ब्रिटिशकालीन पूल बंद केल्यानंतर उर्वरित पुलावर ताण वाढला. ही कोंडी फोडण्यासाठी २०१४ पासून तिसऱ्या पुलाचे काम सुरू आहे. पुलाच्या दोन टप्प्यावरील मार्गिका नोव्हेंबर २०२२ मध्ये पुऱ्या झाल्या. उर्वरित साकेतमार्गे येणारी मार्गिका मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होईल. मग कोंडी फुटेल.

सॅटिसचा विस्तार

ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडील भागात सॅटिस प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. ठाणे पूर्वेकडून थेट पूर्वद्रुतगती महामार्गापर्यंत थेट उन्नत मार्गाने जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे ठाणे स्थानकातून वेगाने बाहेर पडणे शक्य होईल. टीएमटी, एनएमएमटी आणि इतर वाहनांना यामुळे विनाअडथळा मार्गक्रमणा शक्य होईल.

दिवा आरओबीकडे डोळे

दिवा रेल्वे स्थानकातील फाटक बंद करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून दिवा उड्डाणपूल होत आहे. २०१७ साली भूमिपूजन झालेला हा प्रकल्प रखडला होता. आता गती आली आहे. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन पूर्ण झाले असले, तरी दिवा पश्चिमेकडील कामाला अद्याप गती नाही. हे काम झाले तर अपघात टळतील.

नव्या वर्षात नवा शुभारंभ

घोडबंदर रोडवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी साकेत ते गायमुख कोस्टल रोड प्रकल्पाचा प्रारंभ नव्या वर्षांत होऊ शकेल. श्रीनगर-घोडबंदर येऊरच्या पायथ्यापासून जाणारा फूटहिल रोड, ठाणे खाडीतून भिवंडी दिशेला जाणारे तीन उड्डाणपूल, वागळे इस्टेटकडे जाणारा उड्डाणपूल अशा प्रकल्पांची जंत्रीच अपेक्षित आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून हजारो कोटींचे प्रकल्प ठाणेकरांसाठी होतील.

धावपट्टीचे काम

नवी मुंबई विमानतळावरून २०२४ मध्ये प्रवासी विमान उडावे, असे ‘सिडको’चे उद्दिष्ट आहे. त्यापूर्वी मालवाहतूक सुरू होईल. त्यासाठीच धावपट्टीचे काम वेगाने चालू आहे. गेल्या वर्षभरात जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाकडे हे काम आले. सात हजार कोटींचा हा प्रकल्प आता १७ हजार कोटींवर गेला आहे. विमानतळासाठी हिंदुस्थान पेट्रोलियम इंधन पुरवणार असून भूमिगत तेलवाहिनीचे काम सुरू आहे. दोन हजार २६८ हेक्टर भूसंपादन हा महत्त्वाचा टप्पा होता. त्यात दहा गावांच्या स्थलांतरात बराच वेळ गेला.

कल्याण-शीळ रुंदीकरण

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या कल्याण-शीळ रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम नव्या वर्षात पूर्ण होणार असल्याने भिवंडीकडून पनवेलकडे जाणारी वाहने वेगाने जातील.

माणकोली पुलाचा लाभ

डोंबिवली पश्चिमेकडे उल्हास नदीवर माणकोली पूल उभारण्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून या पुलामुळे डोंबिवली-कल्याणपुढील प्रवाशांना कमीत कमी वेळेत ठाणे गाठता येईल. यामुळे कल्याण शिळ रोड आणि कोण-भिवंडी मार्गावरील वाहतूक कोंडी फुटेल.

फाटके इतिहासजमा

टिटवाळा स्थानकात उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व रेल्वे फाटके बंद होतील.

मलंगगडावर फनिक्युलर रेल्वे

मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प दहा वर्षे रखडला. आता हे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या सहा महिन्यांत संपेल. या वर्षात ट्रॉली गडापर्यंत धावल्यास राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना तसेच मलंगगडावर वास्तव्य आणि व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची डोंगर चढण्याच्या परिश्रमांतून सुटका होईल. यामुळे पर्यटन वाढेल.

प्रवाशांची गर्दी विभागणार

अंबरनाथ, बदलापूर रेल्वे स्थानकाच्या मध्यभागी मंजूर झालेल्या चिखलोली रेल्वे स्थानकाचे स्वप्न अखेर सत्यात उतरले. भूसंपादन, रेल्वेच्या थांब्यासाठी तांत्रिक तरतूद आदी बाबींची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित तांत्रिक बाबीची पूर्तता आणि रेल्वे स्थानकाची उभारणी वेळेत झाल्यास चिखलोली रेल्वे स्थानकावरून या वर्षात रेल्वे धावेल. याचा फायदा हजारो नागरिकांसह अंबरनाथ, बदलापूर शहरांच्या वेशीवर राहणाऱ्या रेल्वे प्रवाशांना होईल. अंबरनाथ, बदलापूर रेल्वे स्थानक तसेच स्थानकाबाहेरील परिसरातील गर्दी कमी होईल.

कर्जत-पनवेल बायपास

बदलापूर ते कल्याणपर्यंतच्या प्रवाशांना पनवेल व पुढील भाग गाठण्यासाठी शिळफाटामार्गे लांबचा पल्ला गाठावा लागतो. मात्र, बदलापूर-पनवेल बायपासमुळे या प्रवासाचे अंतर २० मिनिटांवर येईल. बेंडशीळ गावाबाहेर या मार्गासाठी ४.१६ किमी बोगद्याचे काम चालू आहे. अडीच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल.

दहिसर-भाईंदर लिंक रोड

मिरा-भाईंदर ते मुंबई अंतर कापताना दहिसर चेक नाका येथे नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यावर तोडगा म्हणून दहिसर-भाईंदर लिंक रोड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा मार्ग उभारण्याची निविदा मुंबई पालिकेने नुकतीच काढली आहे.

नवी मुंबई मेट्रो

बारा वर्षांपासून सुरू असलेले नवी मुंबई मेट्रोच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून आत्ता या नवीन वर्षात नवी मुंबई मेट्रो निम्म्या मार्गावर न पळवता पहिल्या टप्प्याच्या सीबीडी ते तळोजा या संपूर्ण मार्गावर सुरू करण्याचा प्रयत्न सिडको करणार आहे. त्यानुसार शनिवारी नवी मुंबई मेट्रोची तळोजा ते सीबीडी या मार्गावर चाचणी घेण्यात आली असून पुढच्या सहा महिन्यात मेट्रोचा तळोजा ते सीबीडी हा मार्ग सुरू होईल. बारा वर्षांत संपूर्ण काम न झाल्याने वेळेवर सिडकोला मेट्रो सुरू करता आलेली नाही. संपूर्ण मार्गाचे काम न झाल्याने अखेरीस या मार्गवरील निम्म्या मार्गवर मेट्रो सुरू करण्याचा निर्णय सिडकोने वर्षभरापूर्वी घेतला. मात्र, या निम्म्या मार्गावरही मेट्रो सुरू करता आली नाही. मात्र, या काळात सीबीडी ते तळोजा या संपूर्ण मार्गाचे काम झाल्याने, सहा महिन्यात सीबीडी ते तळोजा या मार्गावर मेट्रो सुरू होईल.

वार्तांकन : नितीन चव्हाण, अमर शैला, चिन्मय काळे, महेश चेमटे, श्रीकांत सावंत, राजलक्ष्मी पुजारे, शरद पवार, मनिषा ठाकूर-जगताप, भाविक पाटील

छाया : गणेश जाधव, स्वप्नील शेजवळ, राजेशकुमार डांगळे

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMikQFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL2VkaXRvcmlhbC9yYXZpdmFyLW1hdGEvaW4tZmV3LXllYXJzLWNvbW11bmljYXRpb24tZmFjaWxpdGllcy1pbi1tdW1iYWktd2lsbC1pbXByb3ZlLWZ1cnRoZXIvYXJ0aWNsZXNob3cvOTY2NTYyNTEuY21z0gGVAWh0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vZWRpdG9yaWFsL3Jhdml2YXItbWF0YS9pbi1mZXcteWVhcnMtY29tbXVuaWNhdGlvbi1mYWNpbGl0aWVzLWluLW11bWJhaS13aWxsLWltcHJvdmUtZnVydGhlci9hbXBfYXJ0aWNsZXNob3cvOTY2NTYyNTEuY21z?oc=5