मुंबई बातम्या

मुंबईतील व्हीडिओ पार्लरवर पोलिसांचा छापा; ग्राहकाचा घाबरून मृत्यू – Maharashtra Times

चेतन सावंत, मुंबई: व्हीडिओ पार्लरमध्ये जुगार खेळताना पोलिसांची धाड पडल्यानंतर घाबरून गेल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या मुलूंड परिसरात हा प्रकार घडला. येथील संगम व्हीडिओ पार्लरवर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने गुरुवारी पहाटे धाड टाकली. या पार्लरमध्ये जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी या पार्लरवर अचानक छापा टाकला.

यावेळी पार्लरमध्ये दिलीप रावजी तेजपाल (वय ५७) नावाची व्यक्ती जुगार खेळत होती. पोलिसांनी अचानाक छापा टाकल्याने तेजपाल प्रचंड घाबरून गेला. त्यामुळे तेजपालच्या छातीत कळ आली आणि तो बेशुद्ध पडला. पोलिसांनी तेजपाल याला तातडीने नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तेजपालचा मृत्यू झाला होता, अशी माहिती परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.

संगम व्हीडिओ पार्लर बेकायदेशीरपणे चालवले जात होते. त्यावर कारवाई करण्यासाठी समाज सेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी पहाटे साडेचार वाजता छापा टाकला होता. धाड टाकल्यानंतर पोलिसांकडून पार्लरमध्ये शोध मोहीम सुरु होती. त्यावेळी पार्लरमध्ये खेळणाऱ्या व्यक्तींना बाजूला बसवून ठेवण्यात आले होते. यावेळी एका व्यक्तीला त्रास जाणवायला लागल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले.मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकाराची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीला कोणतीही मारहाण झाली नव्हती. त्याच्या कुटुंबीयांनीही तसे कोणतेही आरोप केलेले नाहीत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/man-died-in-video-parlour-after-police-raid-in-mumbai/articleshow/91166950.cms