मुंबई बातम्या

मुंबईत शिवसेनेची मोठी ताकद, आम्हाला त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा, आज ठाकरेंची भेट घेणार : अजित पवार – Maharashtra Times

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मुंबईत मोठी ताकद आहे. संघटना म्हणून शिवसेना मुंबईत मोठी आहे. आम्हाला त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे. आज मी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेईन, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सगलेच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. आपापल्या पक्षाचं प्लॅनिंग करत आहेत. त्याच संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार यांनी उत्तर दिलं.

काळानुसार परिस्थिती बदलत असते. वंचितबद्दल काय झालं, ते आता महत्त्वाचं नाही. झालं गेलं गंगेला मिळालं. मात्र निर्णायक क्षणी भूमिका घ्यावी लागते, हे खरं. आमची वंचितविषयी कोणतीही नाराजी नाही. शिवसेनेने वंचितशी युती करण्यास आमची काहीच हरकत नव्हती. फक्त प्रत्येकाने आपापल्या मित्र पक्षांना सांभाळायचं, असं गणित ठरलेलं आहे. अर्थात ते महानगर पालिकेत लागू नसेल, असंही अजित पवार म्हणाले.

विधानसभा आणि लोकसभेला शिवसेनेने (ठाकरे) त्यांच्या कोट्यातल्या जागा वंचितला द्याव्या. उद्या जर आम्ही कोणत्या मित्रपक्षाला सोबत घेतलं तर आमच्या कोट्यातून जागा सोडू. काँग्रेसचंही तसंच असेल, एवढं साधं हे गणित आहे, असंही अजित पवार म्हणाले. दुसरीकडे तुम्ही सेनेसोबत मुंबईत पालिका निवडणूक एकत्र लढण्यास इच्छुक आहे पण काँग्रेसचं काय? काँग्रेस तर स्वबळाचा नारा देत आहे, असा प्रश्न अजित पवार यांना विचारला असता त्यांनी हा काँग्रेसचा अंतर्गत मामला आहे, काँग्रेसवालेच याचं उत्तर देतील, असं सांगितलं.

राष्ट्रवादीची चिंचवड पोटनिवडणुकीविषयी भूमिका विचारली असता अजित पवार म्हणाले, “आमच्या तीन पक्षाची आघाडी आहे. आम्ही यावर चर्चा करु. आजही याबाबत आमच्या पक्षात प्राथमिक चर्चा झाली. काहींनी बिनविरोध करण्याची मागणी केली, काहींनी लढण्याची मागणी केली. पक्षातल्या नेत्यांबरोबर चर्चा करुन यावर अंतिम निर्णय घेतला जाईल त्यांची मागणी आहे यावर आम्ही तीन पक्ष चर्चा करू”

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMijwFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL25jcC1haml0LXBhd2FyLWNvbW1lbnQtb24tbXVtYmFpLW1haGFwYWxpa2EtZWxlY3Rpb24tYW5kLXNoaXZzZW5hL2FydGljbGVzaG93Lzk3Mjc5NzA1LmNtc9IBkwFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL25jcC1haml0LXBhd2FyLWNvbW1lbnQtb24tbXVtYmFpLW1haGFwYWxpa2EtZWxlY3Rpb24tYW5kLXNoaXZzZW5hL2FtcF9hcnRpY2xlc2hvdy85NzI3OTcwNS5jbXM?oc=5