मुंबई बातम्या

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लावला पर्यावरणस्नेही बॅटरीचा शोध – Maharashtra Times

मुंबई : ई-वाहनांपासून सौरऊर्जा साठवणुकीसाठी सध्या जगभरात बॅटरीची मोठी मागणी आहे. मात्र कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे ही मागणी पूर्ण करण्यात मोठी अडचण ठरत आहे. यासाठी जगभर स्वस्त आणि मस्त बॅटरीच्या संशोधनासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात मुंबई विद्यापीठही मागे नाही. विद्यापीठातील नॅनो तंत्रज्ञान विभागाने यावर कलिना संकुलातील मशरूमवर प्रयोग करून अधिक जलद आणि पर्यावरणस्नेही बॅटरीसाठी आवश्यक कार्बन ट्यूब्जची निर्मिती केली आहे. त्यांचा हा संशोधन प्रबंध नुकताच ‘सायन्स डायरेक्ट’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला. त्यांना आयआयटीमधूनही आणखी संशोधनासाठी सूचना करण्यात आली आहे.

बॅटरी किंवा ऊर्जा साठवण्यासाठी नवीन साठवणूक उपकरणांच्या निर्मितीची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. मात्र बॅटरीमधील सुपरकपॅसिटरच्या क्षमतेने काम करणारे नवे उपकरण किंवा त्याला पर्याय शोधणे, हे आव्हानात्मक काम होते. हे काम मुंबई विद्यापीठाच्या नॅनो विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान विभागाचे प्रवीण वाळके यांच्यासह विलेपार्ले येथील केळवणी मंडळाची तंत्रज्ञान संस्था, डाकोटा स्टेट विद्यापीठ, अमिटी विद्यापीठ या संस्थांमधील शोभनाथ गुप्ता, ए. आर. शेकीलूर रेहमान, अशिम गुरुंग आणि दोन परदेशी संशोधक यांच्या टीमने पूर्ण केले.

मशरूमच्या माध्यमातून कार्बन ‌ट्यूब्ज बनविण्याचे प्रयोग होत होते. यामध्ये या संशोधकांनी कलिना संकुलात किंवा अन्यत्र आढळणारे मशरूम गोळा केले आणि ते स्वच्छ करून ठराविक तापमानावर उकळविले. त्यावर प्रक्रिया करून यातून कार्बन ट्यूब्ज तयार करण्यात आल्या. याचा वापर करून बॅटरीची निर्मिती केल्यानंतर ही बॅटरी अधिक प्रभावी काम करू शकते, हे विविध अभ्यासांतून सिद्ध झाल्याचे वाळके यांनी सांगितले. यातून कार्बन उत्सर्जनही कमी होते. शिवाय निसर्गात उपलब्ध असलेल्या साधनापासून याची निर्मिती केल्याने या कार्बन ट्यूब्ज पर्यावरणस्नेही असल्याचेही ते म्हणाले. याबाबतचा प्रबंध प्रसिद्ध झाल्यानंतर आयआयटीसारख्या संस्थांमधून संशोधकांना संपर्क साधण्यात आला. यापुढील अद्ययावत संशोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांनाही याबाबत सहकार्य अपेक्षित असल्याचे वाळके यांनी सांगितले.

कुठल्याही स्थितीत ऑफलाइन परीक्षाच घ्याव्या लागणार: सामंत

imageइंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणाचा अभ्यास अनिवार्य, AICTE समितीचा निर्णय
imageसीईटी परीक्षांचे वेळापत्रक कधी होणार जाहीर? विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

Source: https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-university-students-innovates-eco-friendly-carbon-tubes-for-battery/articleshow/90102276.cms