मुंबई बातम्या

मुंबई-गोवासाठी आता नवी कालमर्यादा; ‘या’ तारखेपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याची राज्य सरकारची ग्वाही – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः महामार्ग रुंदीकरण प्रकल्पाची कार्यवाही ११ वर्षांपूर्वी सुरू होऊनही वर्षानुवर्षे रखडपट्टी होत असलेल्या आणि प्रकल्प पूर्ण करण्याची तारीख वारंवार बदलत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाला (राष्ट्रीय महामार्ग-६६) आता नवी कालमर्यादा देण्यात आली आहे. या महामार्गाचे काम ३१ डिसेंबर २०२३ रोजी पूर्णत्वास जाईल, अशी ग्वाही राज्य सरकारतर्फे सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात प्रगती अहवालाद्वारे देण्यात आली. त्याचवेळी महामार्गाच्या कामाची प्रगती अत्यंत संथ असल्याचे निरीक्षण नोंदवत त्याविषयी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजीही व्यक्त केली.

या महामार्गावर पनवेल ते झारप-पत्रादेवी या सुमारे ४५० कि.मी. लांबीच्या मार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. पनवेल ते इंदापूर (शून्य ते ८४ कि.मी.) हा टप्पा केंद्र सरकारच्या एनएचएआयच्या अखत्यारीत; तर इंदापूर ते पत्रादेवी (महाराष्ट्र-गोवा सीमा) (चिपळूण, हातखंबामार्गे) (८४ किमी ते ४७१ किमी) या टप्प्याची (१० भागांत विभागणी) जबाबदारी राज्य सरकारच्या पीडब्ल्यूडीवर आहे. या प्रकल्पाची रखडपट्टी व महामार्गावरील वाढते अपघात निदर्शनास आणणारी जनहित याचिका उच्च न्यायालयातील वकील अॅड. ओवेस पेचकर यांनी केली आहे. प्रकल्प पूर्णत्वाविषयी प्रतिज्ञापत्रावर हमी दिल्यानंतर वारंवार कालमर्यादा बदलली जात असल्याबद्दल त्यांनी अवमान याचिकाही केली आहे.

‘पूर्वी एनएचएआयने जून-२०१९ आणि नंतर ३१ मार्च २०२२ची पूर्णत्वाची तारीख दिली; तर पीडब्ल्यूडीने आधी ३१ जानेवारी २०२० आणि नंतर ३१ डिसेंबर २०२२ अशी तारीख दिली’, असे पेचकर यांनी अवमान याचिकेत निदर्शनास आणले. याच पार्श्वभूमीवर, सोमवारच्या सुनावणीत सरकारी वकील रीना साळुंखे यांनी अधिकाऱ्यांनी दिलेला प्रगती अहवाल सादर केला. त्यानुसार, १० टप्प्यांपैकी आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या टप्प्यांच्या पूर्णत्वाला आता ३१ डिसेंबर २०२३ ही नवी तारीख देण्यात आली आहे. परिणामी त्याच तारखेला हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. सर्व १० टप्प्यांपैकी या दोन टप्प्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या दोन्ही टप्प्यांचे काम आता नव्या कंत्राटदार कंपनीकडे सोपवण्यात आले असल्याची माहिती साळुंखे यांनी न्यायालयाला दिली. मात्र, ‘प्रकल्पाच्या प्रगतीचा वेग अत्यंत निराशाजनक आहे. ज्या टप्प्यांत अत्यंत कमी काम बाकी होते तिथेही मागील तीन महिन्यांत विशेष प्रगती नाही. याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच त्या-त्या टप्प्यांवर नेमलेल्या अभियंत्यांनी संबंधित कंत्राटदार कंपन्यांना कामाचा वेग वाढवण्यास सांगावे’, असे खंडपीठाने आदेशात नमूद करून पुढील सुनावणी ६ जूनला ठेवली. तसेच त्यादिवशी पुन्हा प्रगती अहवाल मागितला.
mumbai goa highway

पनवेल (पळस्पे) ते इंदापूर : ८६ टक्के

इंदापूर ते वडपाळे : ५२ टक्के

वडपाळे ते भोगाव खुर्द : ७९.५६ टक्के

भोगाव खुर्द ते कशेडी : ७५.३० टक्के

कशेडी ते परशुराम घाट : ९३.२० टक्के

परशुराम घाट ते आरवली : ५५ टक्के

आरवली ते कांटे : १८ टक्के

कांटे ते वाकेड : १७.५३ टक्के

वाकेड ते तळेगाव : ९६ टक्के

तळेगाव ते कळमठ : ९९.७० टक्के

कळमठ ते झारप : ९९.९९ टक्के

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-goa-four-laning-to-be-completed-by-may-2023-ashok-chavan/articleshow/90089684.cms