मुंबई बातम्या

Mumbai Robbery : ‘त्या’ एका नावामुळं मुलुंडमधील ७० लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश – Maharashtra Times

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुलुंड येथील अंगाडियाच्या कार्यालयात दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकून सुमारे ७० लाखांची रोकड पळविणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांच्या पथकाने राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून तसेच वेगवेगळ्या राज्यांतून सात जणांची धरपकड केली आहे. दरोड्यातील ७० लाखांपैकी पोलिसांनी ३७ लाखांची रक्कम हस्तगत केली असून दरोडेखोरांकडे सहा पिस्तुले आणि काडतुसांचा साठाही सापडला आहे. ही आंतरराज्यीय टोळी असून देशाच्या वेगवेगळ्या भागात दरोडा, चोऱ्या करीत असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. कारवर ‘गौरी’ हे देवीचं नाव होतं. या नावावरून पोलीस दरोडेखोरांपर्यंत पोहोचले.

मुलुंड पाच रस्ता येथील व्ही. पटेल फार्म या अंगाडियाच्या कार्यालयात २ फेब्रुवारी रोजी दिवसाढवळ्या दरोडा पडला. कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये हा सशस्त्र दरोडा कैद झाला आणि हे फुटेज समाजमाध्यमांवर व्हायरल होताच व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली. मुंबईसारख्या शहरात अशाप्रकारे दरोडा पडल्याने याची गंभीर दखल घेत पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी परिमंडळ ७चे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांची १२ पथके तपासाकरिता तयार केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तपास कौशल्य पणाला लावून पोलिसांनी सुरत, जौनपूर, नवी मुंबई आणि डोंबिवली येथून मनोज काळे (३२), निलेश चव्हाण (३४), निलेश सुर्वे (२३), बिपिन कुमार राजेंद्र प्रसाद सिंग उर्फ मोनू (३४), रत्नेश उर्फ अनिल कुमार सिंग (२५), दिलीप शिवशंकर सिंह (२३) आणि वशीउल्ला किताबुल्ला चौधरी (४०) या सात जणांना अटक केली. हे सर्व ठाणे, नवी मुंबई, रायगड, उत्तर प्रदेश, सुरत आणि डोंबिवली परिसरात राहणारे आहेत. त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनासह आणखी तीन कार हस्तगत करण्यात आल्या आहेत.

उत्तर प्रदेशचा मोनू मास्टरमाइंड

उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेला बिपिन कुमार राजेंद्र प्रसाद सिंग उर्फ मोनू हा या दरोड्याचा मास्टरमाइंड असून तोच वेगवेगळ्या राज्यांतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांना एकत्र करून टोळी चालवत असल्याचे समोर आले आहे. त्याने तुरुंगात असतानाच ही टोळी तयार केली होती. मोनू सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जौनपूर तसेच इतर जिल्ह्यांमध्ये हत्या, जबरी चोरी, दरोडा यासारखे अनके गुन्हे दाखल आहेत.

अदलाबदली कपड्यांची आणि वाहन क्रमांकाची

दरोडा टाकल्यानंतर हो टोळी नवी मुंबईच्या दिशेला पळून गेली होती. त्यानंतर या टोळीने नवी मुंबईतच चोरलेल्या रकमेचे आठ जणांमध्ये समान वाटप केले आणि त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या मार्गाने निघून गेले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या दरोडेखोरांनी व्हॅनचे क्रमांक वारंवार बदलले. इतकेच नाही तर सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या कपड्यांवरून पोलिसांनी आपल्याला ओळखू नये यासाठी त्यांनी कपडेही वारंवार बदलले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-police-cracks-rs-77-lakh-angadia-robbery-in-mulund/articleshow/89420447.cms