मुंबई बातम्या

आज राज्यात सार्वजनिक सुट्टी मात्र शेअर मार्केट सुरु राहणार – ABP Majha

मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. अर्थात सार्वजनिक सुट्टी असली तरी  आज बीएससी म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सुरु राहणार आहे अशी माहिती BSCकडून देण्यात आली आहे. 

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार सात फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की,  रविवार 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 ( सन 1981चाअधिनियम 26 ) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक सात फेब्रुवारी  रोजी राज्यात  दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असं शासनानं म्हटलं आहे.

लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यदर्शनाकरता जशी व्यवस्था शिवाजी पार्कवर करण्यात आली होती. लतादीदींवर शिवाजी पार्क स्माशानभूमी येथे अंत्यसंस्कार पार पडले. 

लतादीदींच्या अंतिमसंस्कारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार यांच्यासह दिग्गज नेतेमंडळी तसेच कलाविश्वातील दिग्गज कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Source: https://marathi.abplive.com/business/bombay-stock-exchange-stock-market-will-continue-to-be-a-public-holiday-in-the-maharashtra-today-lata-mangeshkar-passes-away-1031205