मुंबई बातम्या

मुंबई शहरात मुली हरवण्याचं प्रमाण जास्त का आहे? – BBC News मराठी

  • प्राजक्ता धुळप
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबईत गेल्या 6 महिन्यांमध्ये 534 मुलींचं अपहरण झालं, अशी माहिती नुकतीच राज्याच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी निदर्शनास आणून दिली. पण मुंबईतून इतक्या मोठ्या प्रमाणात मुली आणि महिला बेपत्ता तसंच अपहरण होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

बेपत्ता झालेल्या मुलीची आणि लहान मुलांची नोंद करताना पोलीस अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा म्हणून लिहितात.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने प्रकाशित केलेली 2016 ते 2020 या तीन वर्षांमधील आकडेवारी पाहिली की, बेपत्ता होणाऱ्या मुलींचं प्रमाण अधिक गंभीरपणे अधोरेखित होतं.

भारतामध्ये महिलांचं त्यातही 18 ते 30 वयोगटातील महिलांचं हरवण्याचं प्रमाण भारतातल्या इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक आहे.

2020 साली म्हणजेच गेल्या वर्षी कोव्हिडच्या संकटात लॉकडाऊन असतानाही मुंबईत या वयोगटातल्या 1 हजार 857 तरुण महिला बेपत्ता झाल्या. त्याखालोखाल बेंगळुरू शहरातून 1हजार 580 तर अहमदाबादमधून 1 हजार 557 तरुण महिलांची बेपत्ता म्हणून नोंद झाली.

मुंबईतल्या एका ताजा घटनेतून महानगरातलं हे विदारक वास्तव अधिक अस्वस्थ करतं.

एमबीबीएसची विद्यार्थिनी अचानक बेपत्ता

गेल्या 29 नोव्हेंबरची ही घटना. पालघर जिल्ह्यात बोईसरला राहणारी 22 वर्षांची सदिच्छा साने बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं. त्या दिवशी सकाळी ती ट्रेनने मुबंईत परीक्षा देण्यासाठी निघाली. मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षांत ती शिकतेय.

बोईसरवरुन विरार ट्रेन त्यानंतर अंधेरीला उतरत तिने फास्ट ट्रेनने कॉलेजला जात असल्याचं आपल्या नातेवाईंकांना फोनवरुन कळवलं. आता परिक्षा झाल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता फोन करते असा निरोपही दिला.

पण ती परीक्षेला आली नाही असा फोन घरी आल्यावर साने कुटुंब हादरलं, त्यावेळी तिचा काहीच संपर्क होत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी बोईसर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली.

स्वदिच्छा बेपत्ता झाली त्या रात्री जीवरक्षकाने काढलेला सेल्फी

सदिच्छाचे वडील मनिष सांगत होते, “सीसीटीव्ही आणि पोलिसांच्या मदतीने तिच्या फोनचं शेवटचं लोकेशन बांद्रा बँण्डस्टॅण्ड असल्याचं कळलं. त्यामुळे तिथे आम्ही स्थानिक मुंबई पोलिसांच्या मदतीने शोधाशोध सुरू केली.”

बेपत्ता झालेल्या रात्री ती बॅण्डस्टॅण्डला होती हे तिथे सुरक्षा गस्त घालणाऱ्या जीवरक्षक मितू सिंह याच्या जबानीतूनही स्पष्ट झालं. 30 नोव्हेंबरच्या पहाटे या जीवरक्षकाने तिची विचारपूस केल्याचंही तपासात पुढे आलंय. या जीवरक्षकाने तिच्यासोबत एक सेल्फी घेतला होता.

स्वदिच्छा साने बेपत्ता प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवून घेतला. या केसचा तपास बोईसर पोलीस तसंच मुंबई पोलीस आतापर्यंत करत होते. आता 23 डिसेंबरला या केसचा तपास मुबई क्राईम ब्रॅंचकडे सोपवला जात असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केलीये.

‘तरुण मुलींच्या FIR ला उशीर’

मुलीच्या केसचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवावा अशी इच्छा मनीष साने यांनी बीबीसी मराठीशी बोलताना आधी व्यक्त केली होती. पण या केसचा तपास अधिक वेगाने करण्यासाठी पोलिसांनी एफआयआर लवकर दाखल करून घ्यायला हवा होता, असं त्यांचं म्हणणं आहे.

“स्वदिच्छा बेपत्ता झाल्यानंतर अपहरणाचा एफआयआर दाखल व्हायला दहा दिवस लागले. ही दिरंगाई टाळता आली असती,” असं ते म्हणतात.

मुलगी

फोटो स्रोत, MONEY SHARMA

स्वदिच्छाच्या घरातल्या पहिल्या खोलीत गुणवंत विद्यार्थिनी म्हणून तिला मिळालेल्या पुरस्कारांच्या ट्रॉफी आहेत. तिचे वडील सतत त्याचा उल्लेख करतात. “ती सांगायची एमबीबीएस झाल्यानंतर रेडिओलॉजीत एमडी करायचंय आणि आयएएससाठी प्रयत्न करायचे आहेत. अगदी बेपत्ता व्हायच्या तीन दिवस आधी तिने सांगितलं की दोन वर्षानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी मी घेईन.”

आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्याचं आणि आयएएस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी स्वदिच्छा त्या दिवशी परिक्षेला न पोहचता बॅण्डस्टॅण्डला कशी पोहचली हा प्रश्न तिच्या कुटुंबाला सतावतोय.

बेपत्ता व्यक्तिंचा महानगरातला शोध

एनसीआरबीने बेपत्ता मुले आणि महिलाविषयक अहवालात म्हटलंय की, वेगवेगळ्या कारणामुळे घराबाहेर पडलेली असुरक्षित (vulnerable) व्यक्ती मानवी तस्करी, हिंसाचार, अंमली पदार्थाचं व्यसन, वेश्या व्यवसाय, शोषणाचे इतर धोके तसंच गुन्ह्यात सहभाग अशा कचाट्यात सापडू शकते.

मुंबई

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईत अशा हरवणाऱ्या मुलीचं तसंच महिलांचं प्रमाण मोठं असल्याने चिंताजनक आहे, असं माजी आयपीएस अधिकारी वसंत ढोबळे सांगतात. मुंबई पोलीसचे माजी सहाय्यक आयुक्त वसंत ढोबळे यांनी ‘मिसिंग पर्सन्स ब्युरो’ची काही काळ जबाबदारी सांभाळली होती.

त्यांच्या मते, “महिला आणि अल्पवयीन मुलं तसंच मुली यांचं हरवण्याचं प्रमाणही तितक्याच गांभीर्याने घेण्याची गरज आहे. खेरीज मुंबईमध्ये लोकसंख्या जास्त असल्याने असुरक्षित व्यक्तीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन तिला पळवून नेणं गुन्हेगारांना तुलनेने सोपं जातं”

‘अद्ययावत तंत्रज्ञान हवं’

हरवलेल्या व्यक्ती शोधण्यासाठी मनुष्यबळासोबतच सोशल मीडियाखेरीज तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे यावर ते भर देतात.

“तेव्हा आम्हाला असं आढळून आलं होतं की चेहऱ्याची ओळख पटवण्याच्या (face recognition ) तंत्रज्ञानाचा वापर सीसीटिव्हीच्या जोडीने केला तर पोलिसांना वेगाने तपास करायला मदत होईल. हरवलेल्या व्यक्तींच्या डेटासोबत तो पडताळून पाहणंही शक्य होईल.”

मुंबई

फोटो स्रोत, Getty Images

“यात चेहऱ्याचा फोटो डेटाबेसमध्ये टाकला जातो. फिंगर प्रिंट प्रमाणे ही फेस रेकग्निशन टेक्नॉलॉजी वापरली जाते. चेहऱ्यावरचे 56 पॉईंट्स फोटो आणि सापडलेली व्यक्ती यांमध्ये जुळवले जातात. सीसीटीव्हीच्या जोडीला हे सॉफ्टवेअर लावलं तर लोकांना शोधणं सोपं जाईल.

“मुंबईत जवळपास 5 हजार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हे तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे पण अजून त्याचा प्रवाभी वापर केला जात नाही. तंत्रज्ञान महाग असल्याने सरकार त्यावर खर्च करतानाही दिसत नाही. देशातच डेव्हलप करण्यात आलं तर कदाचित परवडू शकेल.”

मुंबई

फोटो स्रोत, Getty Images

महिलांच्या बेपत्ता होण्याच्या केसेस संदर्भात मुंबई हायकोर्टाने पोलिसांना तपास करताना स्पष्ट निर्देश दिले आहेत. ‘मुलगी बेपत्ता झाली म्हणजे ती प्रियकरासोबत पळून गेली असेल’ हा दृष्टीकोन पोलिसांनी बदलला पाहिजे तसंच तपास करताना बेपत्ता महिला मानवी तस्करीचा भाग असू शकते हे ध्यानात ठेवावे.

एनसीआरबीच्या अहवालात हरवलेल्या महिला सापडण्याचं महाराष्ट्रातलं प्रमाण 2020 मध्ये 63.4 टक्के इतकं होतं. महाराष्ट्रात 2020 मध्ये 32 हजार 283 महिलांची (सर्व वयोगटातील) बेपत्ता म्हणून नोंद झाली. तर 2019मध्ये राज्यभरात 38 हजार 506 महिला बेपत्ता झाल्या होत्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

‘सोपी गोष्ट’ आणि ‘3 गोष्टी’ हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

Source: https://www.bbc.com/marathi/india-59791304