मुंबई बातम्या

महागडे कॉन्सन्ट्रेटर मुंबई महापालिकेच्या माथी – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

महापालिकेची करोना रुग्णालये आणि करोना उपचार केंद्रांसाठी प्रशासनाने तब्बल १,२०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. चिनी बनावटीच्या प्रत्येकी एका कॉन्सन्ट्रेटरसाठी ७९ हजार रुपये मोजण्यात येणार असून, बाजारभावापेक्षा प्रत्येकी तब्बल १५ ते २० हजार रुपये अधिक दराने ही खरेदी होणार आहे. बाजारात चिनी बनावटीचे कॉन्सन्ट्रेटर ५० ते ६० हजारांना मिळत असूनही प्रशासनाने स्वतः महागडे कॉन्सन्ट्रेटर आपल्या माथी मारून घेतले आहेत. शुक्रवारी या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत ऑक्सिजन कमी पडत असल्याने पालिकेने प्रतिमिनिट दहा लिटर क्षमतेचे १,२०० कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या खरेदीसाठी श्रद्धा डिस्ट्रिब्युटर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. कंत्राटदाराकडून ७९ हजार रुपये एक नग याप्रमाणे १,२०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी १० कोटी ४२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. चिनी बनावटीचे हे कॉन्सन्ट्रेटर असून आहेत. १० लिटर क्षमतेच्या कॉन्सन्ट्रेटरचा बाजारभाव हा ५० ते ६० हजार रुपये इतका आहे. त्या तुलनेत पालिकेने हे कॉन्सन्ट्रेटर चढ्या दराने खरेदी केले असल्याचा दावा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

दोन वर्षांपूर्वी चिनी बनावटीचे कॉन्सन्ट्रेटर ३० ते ४५ हजारांपर्यंत मिळत होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी दर वाढवल्याने ते ६० हजाराच्या आत, तसेच नामवंत कंपन्यांचे कॉन्सन्ट्रेटर मिळत असताना पालिका स्वतःची लूट करून घेत असल्याचा आरोप राजा यांनी केला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात ३०० कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा २६ मेपर्यंत केला जाणार असल्याचे वितरकाने पालिकेला कळवले आहे. मात्र, प्रस्ताव २८ मे रोजी मंजूर झाल्याने पुरवठा कधी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उर्वरित ९०० कॉन्सन्ट्रेटर आवश्यकतेप्रमाणे मागवले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bmc-administration-has-decided-to-buy-1200-oxygen-concentrator-for-covid-care-centre-and-corona-hospitals/articleshow/83054119.cms