मुंबई बातम्या

मुंबई एनसीबी पथकाची जळगावात मोठी कारवाई, १५०० किलो गांजा जप्त, विशाखापट्टणम ‘कनेक्शन’ – Loksatta

मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एनसीबीने तब्बल १५०० किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे.

मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एनसीबीने तब्बल १५०० किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे. तसेच दोन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे या प्रकरणाचं विशाखापट्टणम कनेक्शन समोर आलंय. गुजरातमध्ये जप्त करण्यात आलेल्या ३,००० किलोग्रॅम ड्रग्ज प्रकरणात देखील विशाखापट्टणम कनेक्शन आढळलं होतं.

एनसीबीने केलेल्या तपासात जळगावमधील हा गांजा आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणममधून आणण्यात आल्याचं समोर आलंय. त्यामुळे एनसीबी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

हेही वाचा : गुजरात ATS ची मोठी कारवाई, पाकिस्तानमधून पाठवलेले ६०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, दहशतवादाशी ‘कनेक्शन’

गुजरातमध्ये पाकिस्तानमधून पाठवलेले ६०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (Gujarat ATS) मोरबी जिल्ह्यात ड्रग्जविरोधात (Drugs) मोठी कारवाई केलीय. पोलिसांनी मालिया मियाणामधून ६०० कोटी रुपयांचे १२० किलो ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणाचं ‘कनेक्शन’ पाकिस्तानचा ड्रग माफिया खालिद बख्शसोबत (Khalid Bakhsh) आहे. हे अमली पदार्थ पाकिस्तानमधूनच भारतात पाठवण्यात आल्याचंही बोललं जातंय. याबाबत पोलीस महासंचालक पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.

गुजरात एटीएसने या प्रकरणी ड्रग्जसोबत ४ जणांना अटक केलीय. या प्रकरणातील आरोपी खालिदचा संबंध थेट दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी असल्याचंही समोर येत आहे. भारतात पाठवण्यात आलेल्या या ड्रग्जचं कनेक्शन पाकिस्तानसोबतच दुबईशी देखील असल्याचा आरोप होत आहे. पाकिस्तानचा माफिया खालिदने भारतातील जब्बार आणि गुलाम नावाच्या तस्करांची दुबईतील सोमालिया कँटीनमध्ये भेट घेतली होती, अशीही माहिती मिळत आहे. पोलिसांनी या दोन्ही भारतीय तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source: https://www.loksatta.com/maharashtra/mumbai-ncb-action-on-1500-kg-ganja-in-jalgaon-near-erandol-pbs-91-2678472/