मुंबई बातम्या

मुंबई : फुकट्या प्रवाशांकडून एका दिवसात 20 लाखांची दंड वसुली | Western Railway – Sakal

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या (Western railway) मुंबई सेंट्रल विभागाद्वारे (Mumbai central division) एकदिवसीय तिकीट तपासणी (ticket checking) अभियान राबविली. यात संपूर्ण मुंबई सेंट्रल विभागातील स्थानकावर, एक्सप्रेस, लोकलमध्ये तिकीट तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 4 हजार विना तिकीट प्रवाशांवर (Ticketless commuters) कारवाई करून 20 लाख 14 हजार रुपयांची दंड वसुली (fine collection) केली आहे.

हेही वाचा: हॉटेल्स आणि दुकाने उशीरा पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

सोमवारी, (ता.18) रोजी मुंबई सेंट्रल विभागात एकदिवसीय तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 167 तिकिट चेकिंग स्टाफ आणि 20 रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी होते. यांच्याद्वारे तिकीट तपासणी होत होती. या अभियानात एकूण 4 हजार विनातिकीट आणि अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणारे प्रवासी असे प्रकरण नोंदविण्यात आली. यातून एका दिवसातच 20 लाख 14 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. चालू वर्षातील एका दिवसातील सर्वाधिक दंड वसूली आहे. या आर्थिक वर्षात तिकीट चेकिंग स्टाफने एकूण 11 कोटी 11 लाखांची दंड वसूली केली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.

राज्यसरकारने अनुमती दिलेल्या प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या प्रवाशांशिवाय इतर प्रवाशांनी स्थानक परिसर अथवा लोकलमधून प्रवास करू नये. यासह प्रवाशांनी अधिकृत तिकीट घेऊन प्रवास करावा. प्रवासात कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी केले आहे.

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-railway-update-ticketless-commuters-ticket-checking-fine-collection-nss91