मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत ; ओबीसी आरक्षण, सदस्य संख्या बदलाचा परिणाम नाही – Loksatta

मुंबईसह मुदत संपणाऱ्या इतर महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकाही वेळापत्रकानुसार घेण्याचा प्रयत्न आहे,

मधु कांबळे, लोकसत्ता

मुंबई : राज्य सरकारने इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी ) राजकीय आरक्षण, तसेच सदस्य संख्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असला तरी, मुंबई महानगरपालिके ची सार्वत्रिक निवडणूक फे ब्रुवारी २०२२ मध्ये घेण्याचे निश्चित आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. मुंबईसह मुदत संपणाऱ्या इतर महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकाही वेळापत्रकानुसार घेण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना, राज्य सरकारने प्रभाग पद्धती, सदस्य संख्या व ओबीसींच्या आरक्षणाबाबत काही धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे या निवडणुका मुदतीत होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द के ल्याने, त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी सर्व पक्षांची एकमुखी मागणी होती. परंतु या मुद्दय़ावर निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत, याची जाणीव झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांच्या मर्यादेत राहून ओबीसींना आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला.

 महापालिका व नगरपालिकांमध्ये दोन व तीन सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर आता महापालिकांमधील सदस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी काही कालावधी जाणार आहे, त्यामुळे मार्च २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडतील, अशी शक्यता व्यक्त के ली जात आहे.

या संदर्भात आयुक्त मदान यांच्याशी संपर्क साधला असता, मुदत संपणाऱ्या महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई महापालिके सह ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक व सोलापूर या दहा महानगरपालिकांची मुदत मार्चमध्ये संपत आहे.

 मुंबई महापालिका वगळून प्रभाग पद्धतीत बदल व सदस्य संख्या वाढीचा संबंध इतर महापालिकांशी आहे. मुंबई महापालिके ची सदस्य संख्या २२७ आहे. त्यात अनुसूचित जातीसाठी १५ व अनुसूचित जमातीसाठी फक्त २ जागा राखीव आहेत. तर ओबीसींसाठी ६१ जागा आरक्षित आहेत. मुंबईत ओबीसी आरक्षणाचाही प्रश्न येणार नाही. त्यामुळे मुंबई महापालिके ची निवडणूक फे ब्रुवारीमध्ये घेण्याचे निश्चित असून त्यानुसार तयारी सुरूअसल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-municipal-corporation-elections-in-february-zws-70-2656165/