मुंबई बातम्या

असून अडचण नसून खोळंबा! मुंबईतील ४८ लाख प्रवासी अजूनही लोकल ट्रेनपासून दूरच – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

कार्यालयीन वेळांमध्ये बदल न करता कामावर जाण्याची आणि कामावरून घरी येण्याची वेळ वगळता सर्वांना प्रवासमुभा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे तब्बल ४८ लाख प्रवासी स्वस्त-आरामदायी लोकल प्रवासापासून दुरावला आहे.

मर्यादित वेळेत प्रवास करण्याची मुभा दिल्यानंतर राज्य सरकारने कार्यालयीन बदलाची विनंती मुंबई महानगर प्रदेशातील कार्यालये आणि आस्थापनांना केली होती. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, उल्हासनगर, पनवेल आणि अन्य मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याही आस्थापने आणि कार्यालयाने कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत बदल केला नाही. यामुळे लोकल सुरू होऊन ही प्रवाशांना महागडा रस्ताप्रवास करावा लागत आहे.

मध्य रेल्वेवर सर्व प्रकाराच्या यंत्रणांतून सुमारे पाच लाख ५७ हजार १२४ तिकिटांची विक्री झाली. आतापर्यंत तिकीटविक्रीतून सुमारे २० लाख प्रवाशांनी मंगळवारी प्रवास केल्याचा अंदाज मध्य रेल्वेने व्यक्त केला. पश्चिम रेल्वेवर सुमारे १२ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

करोनापूर्व काळात मुंबई लोकलमधून सुमारे ८० लाख प्रवासी रोज प्रवास करत होते. आता वेळ बंधनासह सुरू झालेल्या लोकलमधून अवघे ३२ लाख प्रवाशांना लोकलप्रवास करणे शक्य झाले. अन्य प्रवासी आजही रस्त्यांवरील वाहतूककोंडीतूनच प्रवास करत आहे.

विनामास्क प्रवास करणाऱ्या ५५९ प्रवाशांवर महापालिका आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. या प्रवाशांकडून एक लाख तीन हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई लोकल वगळता अन्य सर्व क्षेत्रे सुरू झाली आहेत. मुंबईतील रोजगाराचे चक्र लोकलच्या वेगावर अवलंबून असते. लोकल थांबली की मुंबई स्तब्ध होते. असे असून ही मर्यादित वेळेत लोकल सुरू झाल्यामुळे प्रवाशांमधून विशेषत: नोकरदार वर्गांतून अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/48-lakh-mumbaikars-still-cannot-travel-by-local-train/articleshow/80660890.cms