मुंबई बातम्या

मुंबई परिसरातील घरविक्री निर्देशांकात घट ; नाईट फ्रॅंक-नरेडकोचा अहवाल – Loksatta

करोनानंतर मुंबई महानगर परिसरात घरविक्रीने बऱ्यापैकी वेग घेतला असला तरी गेल्या काही महिन्यांत तो खालावला आहे. दसरा-दिवाळीत तो वाढेल, असा विकासकांचा अंदाज होता. मात्र तो अपेक्षेप्रमाणे न वाढल्याने घरविक्री निर्देशांकात घट झाल्याचा अहवाल नाईट फ्रॅंक व नॅशनल रिएल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल म्हणजेच नरेडकोने सादर केला आहे.

हेही वाचा >>>मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावरील पथदिवे एलईडीने उजळणार

दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जून २०२२ या महिन्यात हा निर्देशांक ६२ होता. तो तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै- सप्टेंबर २०२२ मध्ये ६१ इतका नोंदला गेला. पुढील तिमाहीत तो ५७ इतका घसरेल असा अंदाजही या अहवालात वर्तविण्यात आला आहे. घरविक्री निर्देशांक हा प्रामुख्याने घरांच्या त्या-त्या महिन्यात झालेल्या विक्रीवर अवलंबून असतो.मुंबईत हा निर्देशांक कायम ५०पेक्षा अधिक राहिला आहे. करोनाच्या काळात तो ५०च्या खूपच खाली आला होता. घरविक्री आणि नवे प्रकल्प याबाबत हा निर्देशांक आहे. त्यानुसार चौथ्या तिमाहीत म्हणजे ॲाक्टोबर-डिसेंबर २०२२ मध्ये तो पुन्हा ५०च्या खाली जाईल असा अंदाज आहे. या काळात विक्रीसाठी घरेही कमी प्रमाणात उपलब्ध असतील, असे हा अहवाल सांगतो.नाईट फ्रॅंकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांच्या म्हणण्यानुसार, जगभरात निर्माण झालेली मंदीची परिस्थिती यास कारणीभूत आहेत. गुंतवणूकदार सावध झाले आहेत. अनेकांनी घरखरेदी पुढे ढकलली आहे. ही परिस्थिती काही काळ राहू शकते. त्यामुळे घरविक्री थोडी मंदावू शकते.

हेही वाचा >>>२६/११ चा हल्ला कोणीही विसरू शकणार नाही, तो दिवस सर्वांसाठी काळा दिवस होता – एकनाथ शिंदे

नरेडकोचे अध्यक्ष राजन बांदेलकर मात्र हे मान्य करायला तयार नाहीत. गेले काही महिने घरविक्री जोमाने सुरू आहे. खरेदीदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जागतिक पातळीवर मंदीचे वातावरण असले तरी घरखरेदीदारांचा उत्साह टिकून आहे. सध्या चांगली स्पर्धा निर्माण झाल्यामुळे विकासकही अधिकाधिक चांगले देण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे घरखरेदीदारांना अनेक चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बॅंकेकडून काही सवलती जाहीर होण्याची शक्यता असून बांधकाम व्यवसायाला आणखी चांगले दिवस येतील, असा विश्लेषकांचा होरा आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMibGh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvZGVjbGluZS1pbi1ob21lLXNhbGVzLWluZGV4LWluLW11bWJhaS1hcmVhLW11bWJhaS1wcmludC1uZXdzLWFteS05NS0zMjIwODAwL9IBAA?oc=5