मुंबई बातम्या

Mumbai Local | पॅनिक होऊ नका, मुंबई लोकल सुरुच राहणार, बस, मेट्रोही धावणार! – TV9 Marathi

मुंबई : तमाम मुंबईकरांचं लक्ष लागलेल्या कॅबिनेट बैठकीत कोरोनाबाबत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. मुंबईची लाईफलाईन लोकल रेल्वे (Mumbai local trains) सुरुच राहणार आहे. रेल्वे किंवा बस सेवा बंद करण्यात येणार नाही, अशी माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ठाकरे सरकारची आज कॅबिनेट बैठक होती. या बैठकीत कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबई लोकल 7 दिवस बंद करण्याबाबत चर्चा झाली. मात्र अधिकाऱ्यांनी त्याला विरोध केल्याने हा निर्णय टळला. मुंबईचे आयुक्त प्रवीण परदेशी आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लोकल रेल्वे बंद केल्यास आणखी पॅनिक किंवा घबराटीचं वातावरण निर्माण होईल असं नमूद केलं. त्यामुळे मुंबई लोकल चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

येत्या दोन दिवसात परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा चर्चा करु अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय झालं याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत देणार आहेत.

राज्यात कोरोनाची फेज 2 सुरु आहे. हा कोरोना फेज 3 मध्ये जाऊ नये यासाठीच राज्य सरकार मुंबई लोकल बंद करण्याच्या तयारीत होते. तसे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्त संख्येत एकत्र न येता कमीतकमी लोकांनी एकत्र राहणे हा पर्याय असल्याचं मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं होतं.

राजेश टोपे म्हणाले, “रेल्वेच्या बोग्यांमध्ये जास्तीतजास्त किती माणसं असावेत याबाबत काही मार्गदर्शक सूचना देण्यात येण्याबाबत विचार सुरु आहे. कारण पुढील 15 दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण फेज 2 मध्ये आहोत. त्यामुळे या फेजमध्ये कोरोनावर नियंत्रणासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. आपण फेज 2 मधून फेज 3 मध्ये जाऊच नये यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या केल्या जातील. औषध कंपन्यांनी जगभरात इतर देशांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जे प्रयत्न झाले त्याचीही माहिती दिली आहे. त्याचाही उपयोग केला जाईल.”

“सार्वजनिक आरोग्य म्हणून आम्ही हे नक्की सांगू की लोकल ट्रेनमध्ये होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे एकत्र न येण्याच्या नियमांचं पूर्ण उल्लंघन होत आहे. कुठल्याही परिस्थितीत ही गर्दी कमी केली पाहिजे. लोकांनी फक्त बसून प्रवास केला पाहिजे. उभे असले तरी लोकलमध्ये गर्दी असायला नको.” – आरोग्यमंत्री राजेश टोपे

उद्योजकांकडून 100 टक्के काम बंद करण्याचं आश्वासन

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कंपन्या आणि लोकल रेल्वे बंद करणार का या प्रश्नावर राजेश टोपे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “उद्योजकांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 50 टक्के नाही, तर 100 काम बंद करण्याचं आश्वासन दिलं आहे. कॉर्पोरेट्सकडे अनेक सुविधा असतात. व्हर्च्युअर सुविधा करुनही ते काम करु शकतात. त्याचा उपयोग करुन ऑफिस बंद ठेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. काही गोष्टी मात्र बंद करता येणार नाही. औषधांचं वितरण आपल्याला बंद करता येणार नाही. नाहीतर महाराष्ट्रात सर्वदूर औषधं पोहचणार नाहीत. अशा अत्यावश्यक गोष्टी सोडल्या तर इतर कंपन्यांनी आपलं काम थांबवण्याची तयारी दाखवली आहे.”

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – 10
  • पुणे – 7
  • मुंबई – 7
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 3
  • कल्याण – 3
  • नवी मुंबई – 3
  • रायगड – 1
  • ठाणे -1
  • अहमदनगर – 1
  • औरंगाबाद – 1
  • एकूण 41

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • पिंपरी चिंचवड 1 – 17 मार्च
  • मुंबई 1 – 17 मार्च
  • एकूण – 41 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • एकूण – 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/corona-update-mumbai-local-train-service-continue-will-not-suspend-195256.html