मुंबई बातम्या

मुंबई : भूक भागवणारी हेल्पलाईन – Sakal

वडाळा : स्वप्नांचे शहर असलेल्या मुंबईत (Mumbai) दररोज लाखो जण येतात. काहींची स्वप्ने पूर्ण होतात तर काहींच्या नशिबी मात्र यातना येतात. या मायानगरीत आजही लाखो लोक उपाशीपोटीच झोपतात. अशा पिचलेल्या, भुकेल्यांसाठी नवी हेल्पलाईन आकारास आली आहे. मुंबईकर (Mumbai) नागरिकांची चळवळ असलेल्या ‘खाना चाहिये फाउंडेशन’ने त्यात विशेष पुढाकार घेतला आहे.

भुकेल्यांना दोन घास देण्यासाठी व्हाट्सॲपचा वापर करण्यात आला आहे. एक चाटबोट तयार केला असून तो हेल्पलाईनचे काम करणार आहे. व्हाट्सॲप वापरणाऱ्या कोणत्याही नागरिकाने ७६६९ ८०० ४७० या क्रमांकावर पिंग केले की त्याला आपल्या परिसरातील भुकेल्या नागरिकांची माहिती ‘खाना चाहिए फाऊंडेशन’ला देता येणार आहे. त्यानंतर स्वयंसेवक आपल्या संपर्कातील नजीकच्या व्यक्तीशी संपर्क साधून तातडीने धाव घेऊन भुकेल्या व्यक्तीला जेवण पोहोच करणार आहेत. हा चाटबोट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत तयार करण्यात आला आहे. व्हाट्सॲप व गपशप यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आला आहे. प्रथम इंडिया, गिव्ह इंडियाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नामांकित बँकर उज्ज्वल ठकार यांनी या उपक्रमाचा शुभारंभ केला.

हेही वाचा: कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत

मोठा वर्ग जोडला जाईल!
‘भुकेल्यांना मदत करण्यासाठी आणि त्या कामात सामान्य माणसांचा सहभाग वाढविण्यासाठी पूर्वी सहजसोपा असा पर्याय उपलब्ध नव्हता. मात्र या नव्या उपक्रमामुळे मोठा वर्ग या मोहिमेशी जोडला जाईल’, असा विश्वास ‘खाना चाहिए’ या फाउंडेशनचे सहसंस्थापक आणि डिजिटल हेड स्वराज शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समृद्ध करणारा अनुभव घेण्याची संधी मिळाली. यामुळे अधिकाधिक गरजू लोकांना दररोज भोजन देता येईल, असे गपशपचे सीईओ रवी सुंदरराजन म्हणाले.

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-initiative-of-khana-chahiye-foundation-a-helpline-that-satisfies-hunger-psp05