मुंबई बातम्या

Mumbai News । मुंबई बुडण्यापासून वाचवणार! – Sakal

मुंबई
sakal_logo

By

मुंबई : सध्याच्या वेगाने पर्यावरणाची हानी सुरू राहिल्यास दक्षिण मुंबईचा ७० टक्के; तर नरिमन पॉइंटचा ८० टक्के भाग २०५० पर्यंत पाण्याखाली जाण्याचे भाकीत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मुंबईला समुद्रात बुडण्यापासून वाचवण्यासाठी महापालिकेने वातावरण कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाले. या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.

मुंबईत वाढलेले काँक्रीटीकरण, बदललेला पावसाचा पॅटर्न, तसेच समुद्राची वाढत असलेली पातळी, यामुळे सात बेटांच्या या शहराला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दक्षिण मुंबईतील ए, बी, सी, डी हे चार प्रभाग ७० टक्के; तर नरिमन पॉईंट ८० टक्के पाण्याखाली जाईल, असा अंदाज आहे.

मुंबईला पाण्याखाली जाण्यापासून रोखण्यासाठी हा कृती आराखडा तयार केल्याचा दावा मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केला. महाराष्ट्राची निम्‍म्याहून अधिक लोकसंख्या शहरांमध्ये राहते. त्यामुळे मुंबई प्रमाणेच इतर शहरांनीही असाच कृती आराखडा तयार करून अमलात आणावा, तसेच आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडून सहकार्य मिळेल, असे आश्वासन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. यापूर्वी राज्यात पर्यावरणाला फारसे महत्त्व दिले नाही; मात्र गेल्या दोन वर्षांत सरकारने याची गंभीरतेने दखल घेतली, असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी नमूद केले.

जगातील पहिला आराखडा!

मुंबई वातावरण कृती आराखडा हा देशातीलच नव्हे, तर बहुधा जगातील पहिलाच कृती आराखडा आहे. गारगाई पिंजाळ धरणाचा प्रकल्प अहवाल तयार असताना, पाच लाख झाडे वाचवण्यासाठी हा प्रकल्प रद्द केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. किनारी मार्ग प्रकल्प, नियोजित मलनिःसारण प्रकल्प, समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, मध्य वैतरणा धरणावरील संकरित ऊर्जा प्रकल्प पर्यावरणपूरक प्रकल्प मुंबईत सुरू असल्याचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.

Source: https://www.esakal.com/mumbai/save-mumbai-from-drowning-environment-action-plan-uddhav-thackeray-kgm00