मुंबई बातम्या

मुंबई अग्निशमन दल हळहळले! प्रशिक्षण घेऊन घरी परतलेल्या अधिकाऱ्याचे झोपेतच निधन – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी उत्कर्ष बोबडे यांचं झोपेतच निधन
  • प्रशिक्षण घेऊन परतल्यानंतर विश्रांती घेत असताना हृदयविकाराचा झटका
  • बोबडेंचा मृत्यू कर्तव्य कालावधीतील समजण्यात यावा, अशी संघटनेची मागणी

मुंबई: अग्निशमन दलाचे नरीमन पॉइंट येथील केंद्र प्रमुख उत्कर्ष बोबडे यांचं गुरुवारी रात्री झोपेतच निधन झालं. ते अवघ्या ३८ वर्षांचे होते. उत्कर्ष बोबडे यांचा मृत्यू कर्तव्यावर असताना झाला आहे असं मानण्यात यावं, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. (Mumbai Fire Brigade Officer Utkarsh Bobde dies of heart attack)

बोबडे हे २००६ साली बृहन्मुंबई मनपाच्या अग्निशमन दलात भरती झाले होते. सध्या ते नरीमन पॉइंट येथील अग्निशमन केंद्रावर वरिष्ठ अग्निशमन केंद्र अधिकारी म्हणून कार्यरत होते. वडाळा येथील कमांडिंग सेंटरमध्ये गुरुवारी सकाळी साडेसात ते दुपारी दीडपर्यंत त्यांनी प्रशिक्षण घेतले. या ठिकाणी २० किलो वजन पाठीवर घेऊन श्वसन उपकरणे सराव (B A Set Training Session) केला. सीडी चढणे, ट्रेड मिल, सायकल चालवणे, छोट्या आणि वाकड्या-तिकड्या पाइप मधून २० किलो वजन घेऊन दुसऱ्या बाजूला जाणे हे अतिशय जोखमीचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. सराव पूर्ण करून घरी गेल्यानंतर विश्रांतीसाठी ते झोपले असता हृदयविकाराचा झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली. अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी ही माहिती दिली.

वाचा: राष्ट्रवादीच्या आमदाराच्या कामाची थेट गाडगेबाबांशी तुलना; मिटकरी म्हणाले…

या घटनेचा संबंध बोबडे यांच्या दिनक्रमाशी असल्याचं दिसत असल्यामुळं त्यांचा मृत्यू कर्तव्या कालावधीत झाल्याचं गृहित धरण्यात यावं, अशी मागणी फायर ब्रिगेड ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी केली आहे. बोबडे यांच्या कुटुंबीयांनी देखील हीच मागणी केली आहे.

वाचा: शिवसेना-भाजप युतीबद्दल मुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य; नारायण राणे म्हणतात…

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-fire-brigade-officer-utkarsh-bobde-dies-of-heart-attack-at-38/articleshow/86291280.cms