मुंबई बातम्या

तरुणीला न्यायालयाचा दिलासा – Loksatta

प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रद्द

मुंबई :  प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून एका २३ वर्षीय तरुणीची मुक्तता करत उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.  तीन वर्षांपासून ती त्याला सतत छळत होती, असा आरोप तिच्यावर होता. परंतु तिचे वर्तन आत्महत्येस प्रवृत्त करणारे नव्हते असे न्यायालयाने म्हटले आहे.

पोलिसांच्या आरोपांनुसार, संगणक विज्ञानातून (कॉम्प्युटर सायन्स) पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तरुणाने सप्टेंबर २०१७ मध्ये वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या खोलीतून चिठ्ठीही मिळाली होती. त्यात याचिकाकर्त्यां मुलीचे नाव नमूद होते. तसेच तिने त्याला जीवन संपवण्यासाठी उद्युक्त केल्याचा पोलिसांनी दावा केला होता. त्याने तिच्याशी बोलणे सोडले होते. असे असतानाही त्याच्याशी बोलण्यासाठी  विविध समाजमाध्यमाच्या माध्यमांतून त्याला संदेश पाठवायची. त्याच्याशी बोलण्यासाठी तिने आपल्या मैत्रिणीच्या समाजमाध्य खात्याचाही वापर केला, असे पोलिसांचे म्हणणे होते. मुलाने आपल्या चिठ्ठीत लिहिले होते की, याचिकाकर्ती तरुणीने तिच्या मित्रांना त्याला धमकावण्यास सांगितले होते. त्यातील काही जणांनी आपल्याला मारहाणही केली. त्यानंतर आणि तिच्याकडून दिला जाणारा मानसिक त्रास सहन न झाल्याने आपण आत्महत्येचा निर्णय घेतला.  या लिहिलेल्या चिठ्ठीवरुनच तरुणी आत्महत्येस कारणीभूत असल्याचे म्हटले होते.

मात्र पोलिसांनी सादर केलेले पुरावे, आत्महत्येपूर्वी तरुणाने लिहिलेल्या चिठ्ठीचा विचार करताना ही कारणे  आत्महत्येस प्रवृत्त करण्यास पुरेशी नाहीत, असे न्यायालयाने म्हटले.   लिहिलेल्या चिठ्ठीतून याचिकाकर्तीने त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे वा हेतूत काही केलेले दिसत नाही. त्याला तिच्याशी बोलायची इच्छा नव्हती आणि त्याच्याशी बोलण्यासाठी तिने अयोग्य मार्गाचा अवलंब केला यावरून तिने त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे दिसून येत नाही. उलट तरुणाच्या चिठ्ठीतून त्याला याचिकाकर्तीचे अन्य मुलांशी बोलणे त्यांच्यासोबत फिरणे पसंत नव्हते. त्यामुळेच तिच्याविरोधातील गुन्हा रद्द करणे योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on November 5, 2020 12:12 am

Web Title: bombay hc relief to the young woman after cancel inciting suicide charges zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/bombay-hc-relief-to-the-young-woman-after-cancel-inciting-suicide-charges-zws-70-2320388/