मुंबई बातम्या

मुंबई, ठाण्यात पाऊस परतला; पुढील तीन-चार दिवसात मुसधार पावसाची शक्यता – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

सलामीलाच तडाखेबाज बरसात करणाऱ्या पावसाने मुंबईला दिलेल्या रेड अॅलर्टनंतर दडी मारली होती. मात्र, बुधवारी पावसाने परतत शहर आणि उपनगरांत जोरदार उपस्थिती लावली. बुधवारी सकाळी शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली. नंतर संध्याकाळच्या सुमारास उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची नोंद झाली. कुलाब्यामध्ये दिवसभरात ९८ तर सांताक्रूझ येथे २३.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबई, ठाण्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात येत्या तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाचे अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्तवली. ‘स्कायमेट’नेही येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईतील पावसाचे प्रमाण रविवार, सोमवार या दोन दिवसांच्या तुलनेत वाढेल, असे स्पष्ट केले. सध्या दक्षिण कोकणामध्ये निर्माण झालेली ढगांची द्रोणीय स्थिती थोडी उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पावसाचे प्रमाण थोडे वाढू शकते, असे ‘स्कायमेट’चे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले.

मुंबईत पावसाच्या उपस्थितीमुळे कमाल तापमानात पुन्हा एकदा थोडी घट झाली आहे. मंगळवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३२.३ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर बुधवारी २९.५ अंश सेल्सिअस अशी कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथेही २९.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.

उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळच्या किनाऱ्यापर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. या प्रभावामुळे दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये पुढील तीन दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल, असे पूर्वानुमान हवामान विभागाने वर्तवले आहे. कोल्हापूर व साताऱ्याच्या घाट परिसरातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भामध्ये शनिवारपर्यंत सर्वदूर पावसाची शक्यता आहे. विदर्भात मेघगर्जनेसह, वीजा आणि मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भामध्ये अनेक ठिकाणी शनिवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे शनिवारपर्यंत अशा स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पडेल. तर अकोला, अमरावती, बुलडाणा येथे गुरुवारी मेघगर्जनेसह पाऊस पडून नंतर हलक्या ते मध्यम सरी बरसतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणात ऑरेंज अॅलर्ट

कोकणामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची मंगळवारी नोंद झाली. दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण येथे १५ जूनला १०० मिलीमीटरहून जास्त पावसाची नोंद झाली. दोडामार्ग आणि मालवण येथे १३२ तर कुडाळ येथे १२९ मिलीमीटर पाऊस झाला. रत्नागिरी येथेही बुधवारी सकाळी ८.३०पर्यंत झालेल्या नोंदीनुसार आधीच्या २४ तासांमध्ये ११२.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर हर्णे येथे ९०.६ मिलीमीटर पाऊस पडला. कोकणामध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणामध्ये शुक्रवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार पाऊसही पडू शकेल.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/intense-rain-likely-in-parts-of-mumbai-thane-says-indian-meteorological-department/articleshow/83593072.cms