मुंबई बातम्या

मुंबई : तोतया पोलिसांनी दागिने पळवले – Maharashtra Times

नवी मुंबई : पोलिस असल्याची बतावणी करून अज्ञात त्रिकुटाने ६२ वर्षीय महिलेजवळील २ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे दागिने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली. या त्रिकुटाविरोधात खारघर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

या घटनेत फसवणूक झालेल्या महिलेचे नाव कुसुम ठक्कर (६२) असे असून त्या खारघर सेक्टर-७मध्ये कुटुंबासह राहण्यास आहेत. बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कुसुम ठक्कर या भाजी आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्या भागातील नर्सरीजवळ उभ्या असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांना बालावून घेतले. त्यानुसार कुसुम त्याच्याजवळ गेल्या असताना, त्याठिकाणी इतर दोन व्यक्तीदेखील आल्या. त्यांनी पोलिस असल्याचे सांगून सुरक्षेसाठी दागिने काढून ठेवण्यास सांगितले. त्यानुसार कुसुम यांनी दागिने काढून एका कागदात ठेवल्यानंतर भामट्याने ते व्यवस्थित ठेवण्याचा बहाणा करून हातचलाखी करून चोरले. त्यानंतर तिघा भामट्यांनी पलायन केले. कुसुम ठक्कर घरी आल्यानंतर त्यांनी आपले दागिने तपासले असता, त्यात दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/thane/fake-police-robbed-gold-worth-rupees-2-lakh-35-thousand-from-woman-in-navi-mumbai/articleshow/81239425.cms