मुंबई बातम्या

डॉक्टरला मारहाण; एक लाखाचा दंड – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘करोनाचे संकट निर्माण झाल्यानंतर लॉकडाउन काळात सर्व लोक घरात असताना डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या जवळच्या लोकांपासून दूर राहत आपले कर्तव्य बजावले आणि कित्येक करोना रुग्णांसाठी तेच तारणहार ठरले. त्यांनी निस्वार्थपणे करोना योद्धा म्हणून केलेले काम आणि मानवतेसाठी दिलेले योगदान हे अमूल्य असून ते आयुष्यभरासाठी कृतज्ञतेस पात्र आहेत. करोना संकटाच्या काळात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी म्हणजे आपल्या शस्त्रांसह लढणारी धाडसी वैद्यकीय सेनाच आहे’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची वाखाणणी केली आहे.

बारामतीमध्ये एका करोना रुग्णालयात निकटवर्तीयाचे अचानक निधन झाल्याने डॉक्टरला मारहाण करणाऱ्या तरुणाला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर करून त्यासाठी एक लाख रुपयांचा दंड लावताना न्या. भारती डांगरे यांनी आपल्या आदेशात हे निरीक्षण नोंदवले. शिवाजी जाधव असे या तरुणाचे नाव आहे. ‘या प्रकरणात नोंद झालेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक केल्यास पोलिसांनी त्याला २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या एक किंवा दोन हमीदारांवर सोडावे. आरोपीने या प्रकरणातील साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे प्रभाव टाकू नये. तसेच तपास अधिकाऱ्याने बोलावल्यावर हजर व्हावे. मात्र, हा अटकपूर्व जामीन केलेल्या बेजबाबदार कृतीबद्दल दंड म्हणून एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याच्या अटीवर अवलंबून असेल. आरोपीने दंडाची ही रक्कम रोखीने किंवा धनादेशाद्वारे तपास अधिकाऱ्याकडे दोन आठवड्यांत जमा करावी’, असे न्यायमूर्तींनी आदेशात स्पष्ट केले.

१० सप्टेंबरच्या घटनेत शिवाजी जाधवने रुग्णालयात डॉ. सुजीत अडसूळ यांच्याशी व अन्य कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली तसेच डॉ. सुजीत यांना मारहाण केली, अशा आरोपाखाली त्याच्याविरोधात साथरोग प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला होता. ‘करोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सेवा अत्यंत महत्त्वाची असताना मारहाणीचे असे प्रकार गंभीर आहेत’, असे म्हणणे सरकारी वकील श्रीकांत गावंड यांनी मांडले. तर ‘एक तासापूर्वीच रुग्णाने कुटुंबीयांशी फोनवर संवाद साधला होता, मग अचानक रुग्णाचा मृत्यू कसा झाला, याची माहिती घेण्यासाठी मी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, डॉक्टरांनी योग्य माहिती न दिल्याने संतापाच्या भरात माझ्याकडून कृती झाली. रुग्णाच्या सर्व कुटुंबीयांना धक्का बसला होता आणि त्या परिस्थितीत माझी ती वर्तणूक होती. आता त्याविषयी मला पश्चात्ताप होत आहे’, असे म्हणणे आरोपीतर्फे मांडण्यात आले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bombay-high-court-directs-to-recovered-one-lakh-fine-from-who-attacks-on-doctors-in-pune/articleshow/78860521.cms