मुंबई बातम्या

‘२६/११’मधील पीडितेच्या अर्जाचा विचार करा – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईवर सुमारे १२ वर्षांपूर्वी झालेल्या ‘२६/११’ दहशतवादी हल्ला प्रकरणात खटला चालून फाशीची शिक्षा झालेला एकमेव पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अजमल आमिर कसाब याच्याविरुद्ध अवघ्या १० वर्षांची असूनही न्यायालयात अत्यंत हिमतीने साक्ष देणारी देविका रोटावन हिने राहण्यासाठी डोक्यावर हक्काचे छप्पर नसल्याची कैफियत याचिकेद्वारे मांडली होती. त्याची गंभीर दखल घेत अत्यल्प उत्पन्न गटातील घर मिळण्यासाठी देविकाने केलेल्या अर्जाचा विचार करा, असे निर्देश न्या. नितीन जामदार व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने नुकतेच दिले.

‘देविकाने घरासंदर्भात आतापर्यंत विविध प्रशासनांना पत्र लिहिले असून कोणीही त्यावर नकार दिलेला नाही. तिचा जुलै-२०१९मधील अर्जही राज्य सरकारकडे अद्याप प्रलंबित आहे. मात्र, या याचिकेत जो तपशील दिला आहेत तो त्या अर्जात दिसत नाही. त्यामुळे ही याचिका तुम्ही मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे निवेदन म्हणून पाठवू शकता’, असे खंडपीठाने देविकाचे वकील अॅड. उत्सव बैन्स यांना सुचवले. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीलाही या याचिकेची प्रत मुख्य सचिवांकडे पाठवण्यास सांगून मुख्य सचिवांना याविषयी विचार करण्याचे निर्देश खंडपीठाला दिले.

कसाब व त्याचा साथीदार ईस्माईल खान या दोघांनी २६ नोव्हेंबर २०१८च्या रात्री सीएसटी स्थानकात बेछुट गोळीबार करून अनेकांचे प्राण घेतले. त्या गोळीबारात देविकाच्या उजव्या पायाला गोळी लागली होती. त्यामुळे तिला अनेक वर्षे वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. त्या हल्ल्याप्रकरणी चाललेल्या खटल्याच्या वेळी देविका १० वर्षांची होती आणि तिचा पाय जायबंदीच होता. तरीही तशा अवस्थेत कुबड्या घेऊनच देविका आर्थर रोड तुरुंगातील विशेष न्यायालयात कसाबविरुद्ध साक्ष देण्यासाठी पोहोचली होती.

सध्या वांद्रे पूर्व येथील सुभाषनगरमधील चाळीत ती व तिचे कुटुंब भाड्याच्या घरात राहते. ‘माझे वडील व भाऊ यांना अनेक आजार असल्याने नोकरी धंदा करणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे आमचे अनेक महिन्यांपासूनचे भाडेही थकले आहे. करोनामुळे तर आमचे संकट आणखी गहिरे झाले असून भाडे भरणे शक्य होत नसल्याने बेघर होण्याची भीती आहे. मी चेतना कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असून भविष्यात मला सनदी सेवेत करिअर करायचे आहे. मात्र, पैशांअभावी पुढील शिक्षणाचीही चिंता आहे. यापूर्वी जे आर्थिक सहाय्य मिळाले, ते माझ्या वैद्यकीय उपचारांवर खर्च झाले. लहानसे का होईना घर मिळावे याकरिता सरकारदरबारी अनेक निवेदने दिले. केंद्र व राज्य सरकारचे प्रतिनिधी अनेकदा आमच्या चाळीतील घरी भेट देऊन परिस्थिती पाहून गेले. मात्र, तरीही दोन्ही सरकारांनी आमच्या दैनावस्थेकडे दुर्लक्षच केले’, अशी कैफियत देविकाने याचिकेत मांडली होती.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/26/11-attack-bombay-high-court-asks-state-to-consider-victims-petition-for-house/articleshow/78705209.cms