मुंबई बातम्या

कॅन्सर रूग्णालयाला हायकोर्टाचा दिलासा – Maharashtra Times

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर

धंतोली येथील सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमटोलॉजि अॅण्ड ऑन्कॉलजी या कॅन्सर सुपर स्पेशालिटी रूग्णालयाला पुढील आदेशापर्यंत करोना रूग्णालय म्हणून घोषित करण्यात येऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.

सीआयआयएचओचे संचालक डॉ. अविनाश पोफळी यांनी मनपाद्वारे त्यांचे रुग्णालय करोना रुग्णांसाठी वापरण्यात येईल, अशी शक्यता वर्तवणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यानुसार, धंतोलीतील सदर रूग्णालय केवळ कर्करोगावर उपचार करण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. तिथे बोनमॅरो सारख्या इतर आजारांवरही उपचार होत आहेत. परंतु मनपाने तिथे करोना रुग्णांना उपचारासाठी ठेवण्याची सक्ती केल्यास त्याचा परिणाम रूग्णालयावर होणार आहे. कॅन्सरचे रुग्ण आधीच कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन लगेच होण्याची शक्यता असतो. त्यात करोनाचे रुग्ण दाखल झाल्यास त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडताना अॅड. आनंद परचुरे म्हणाले. रुग्णालयाला अद्याप करोना रुग्णालय घोषित केलेले नाही. याचिकाकर्त्याने केवळ शक्यता वर्तवली आहे, असे मनपातर्फे सांगण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्याची दखल घेत मनपाला नोटीस बजावली. चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. तोवर सीआयआयएचओला करोना रुग्णालय न करण्याचा आदेश दिला.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/bombay-high-court-nagpur-bench-relief-to-cancer-super-specialty-hospital/articleshow/77788162.cms