मुंबई बातम्या

मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास मुंबईत सशर्त परवानगी, राज्यात बंदी – Loksatta

मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं आज महत्त्वाचा निकाल दिला. मुंबई उच्च न्यायालयानं फक्त मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मुंबई वगळता राज्यात कुठेही मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास परवानगी नाही, असंही न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं आहे.

करोनामुळे देशभरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक वार्षिक कार्यक्रमांबरोबर धार्मिक सण उत्सवांवरही सरकारकडून करोना प्रसाराचा धोका लक्षात घेऊन बंधनं आणण्यात आली आहेत. मुस्लीम समुदायात मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यात येते. मात्र, करोनामुळे सोशल डिस्टसिंगसह इतर बंधन आणण्यात आल्यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं फक्त मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास परवानगी दिली आहे. या मिरवणुकीत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सहभागी होता येणार नाही. त्याचबरोबर मुंबई वगळता राज्यात इतर कुठल्याही भागात मिरवणूक काढण्यास परवानगी नाही, असंही न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं आहे.

“…तर एका विशिष्ट समाजाला लक्ष्य केलं जाईल”

मिरवणूक काढण्याच्या मागणीसंदर्भात लखनौतील मुस्लीम समुदायातील काही व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीत मागणी फेटाळून लावत देशभरात मोहरम मिरवणुका काढण्यास नकार दिला होता. न्यायालय म्हणाले,”जर आम्ही मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी दिली तर गोंधळ होईल आणि एका विशिष्ट समुदायाला करोनाचा प्रसार केला म्हणून लक्ष्य केलं जाईल. आम्हाला ते नको आहे. एक न्यायालय म्हणून आम्ही जनतेच्या आरोग्याबद्दल धोका पत्करू शकत नाही. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी मिरवणूक काढण्याची मागणी केली, तर आम्ही उद्भभवणाऱ्या धोक्याचा विचार केला असता,” असं न्यायालयानं आदेशात म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on August 28, 2020 6:43 pm

Web Title: bombay high court allows taziya procession on muharram in mumbai bmh 90

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/bombay-high-court-allows-taziya-procession-on-muharram-in-mumbai-bmh-90-2261060