मुंबई बातम्या

बलात्काराची खोटी तक्रार; तरुणीला दंड – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

प्रियकराविरुद्ध बलात्काराची खोटी एफआयआर नोंदवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने एका तरुणीला नुकताच २५ हजार रुपयांचा दंड लावला आहे. दंडाची ही रक्कम महाराष्ट्र पोलिस कल्याण निधीत चार आठवड्यांमध्ये जमा करण्याचा आदेशही न्यायालयाने तिला दिला आहे.

‘आरोपीने मला अंमलीपदार्थाचे सेवन करायला लावून माझ्यावर बलात्कार केला’, अशी तक्रार या तरुणीने नालासोपारा पोलिस ठाण्यात नोंदवली होती. पोलिसांनी त्यावरून १६ मार्च रोजी एफआयआर दाखल केला होता. मात्र, हा एफआयआर रद्द करावा, अशा विनंतीची याचिका तक्रारदार तरुणीनेच मागील महिन्यात उच्च न्यायालयात केली. ‘आरोपीशी माझे प्रेमसंबंध आहेत. मात्र कुटुंबीयांना त्याविषयी कळल्यानंतर त्यांच्या दबावामुळे मी खोटी कहाणी रचली आणि बलात्काराविषयीची तक्रार नोंदवली’, असे म्हणणे तरुणीच्या वकिलांनी न्या. आर. डी. धनुका व न्या. व्ही. जी. बिश्ट यांच्या खंडपीठासमोर ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे झालेल्या सुनावणीत मांडले. मात्र, ‘पोलिस याप्रकरणी तपास करत असून आरोपीविरोधात आरोपपत्रही दाखल केले जाणार आहे. मात्र, न्यायालय एफआयआर रद्द करण्याचा विचार करत असेल तर याचिकादाराला जबर दंड लावायला हवा’, असे म्हणणे सरकारी वकील अरुणा कामत यांनी मांडले. खंडपीठाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला.

‘कुटुंबीयांच्या दबावापोटी बलात्काराची तक्रार नोंदवली, हे म्हणणे स्वीकारून एफआयआर रद्द केला जाऊ शकत नाही. मात्र, प्रकरण पुढे चालवण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने आम्ही एफआयआर रद्द करण्याची विनंती स्वीकारत आहोत. मात्र, या प्रकाराबद्दल तिला धडाही मिळायला हवा. त्यामुळे २५ हजार रुपयांचा निधी पोलिस कल्याण निधीमध्ये चार आठवड्यांत जमा करावा. अन्यथा एफआयआर रद्द करण्याचा आदेश मागे घतला जाईल’, असे खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bombay-high-court-has-punished-woman-for-making-false-rape-allegations/articleshow/77768673.cms