मुंबई बातम्या

मुंबई: स्वस्तात सदनिका देण्याचे आमिष दाखवून साडेचार कोटीची फसवणूक; कंपनीच्या तीन संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल – Loksatta

स्वस्तात सदनिका देण्याचे आमिष दाखवून एका हॉटेल व्यावसायिकासह सातजणांची सुमारे साडेचार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार जोगेश्वरी परिसरात घडला. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी संबंधित कंपनीतील तीन संचालकाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचा >>>मुंबईः परदेशातून भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली अंधेरीतील तरुणीची चार लाखांची फसवणूक

जोगेश्वरी परिसरात वास्तव्यास असलेल्या तक्रारदार मोहनदास शेट्टी (६८) त्यांचे गोरेगाव येथे ‘मोहन पंजाब’ नावाचे हॉटेल आहे. जोगेश्वरीमध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू असून या इमारतीत एक सदनिका स्वस्तात देण्याचे आमिष आरोपींपैकी एकाने मोहनदास यांना दाखविले होते. भोजू शेट्टी, प्रवीण शेट्टी, रत्नाकर शेट्टी, प्रिया विजय शेट्टी, आनंद शेट्टी आणि आयतु मूल्या यांनी एक गट तयार करून एकत्र सदनिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता, असे मोहनदास यांनी सांगितले. मोहनदास शेट्टी यांनी ४२ लाख ७० हजार रुपये, भोजू शेट्टी यांनी ४७ लाख ६० हजार रुपये, प्रवीण शेट्टी यांनी ३७ लाख ४० हजार रुपये, जगदीश बजाज यांनी ६२ लाख रुपये, प्रिया शेट्टी यांनी ५८ लाख रुपये, आनंद शेट्टी यांनी ५५ लाख ५५ हजार रुपये, रवी दोशी यांनी पाच लाख रुपये असे एक कोटी ९२ लाख ४१ हजार रुपये रोख, तर दोन कोटी ५१ लाख ४४ हजार रुपये धनादेशाद्वारे देण्यात आले होते. पण १४ वर्षांनंतरही हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. तसेच तक्रारदार व इतर व्यक्तींचे पैसेही देण्यात आले नाहीत. अखेर त्यांनी याप्रकरणी मेघवाडी पोलिसांत तक्रार केली होती. पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या तीन संचालकांविरोधात फसवणूक, तसेच महाराष्ट्र मालकी हक्कांच्या सदनिका अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMihQFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL2ZyYXVkLW9mLWZvdXItYW5kLWEtaGFsZi1jcm9yZXMtYnktcHJldGVuZGluZy10by1naXZlLWNoZWFwLWZsYXRzLW11bWJhaS1wcmludC1uZXdzLWFteS05NS0yLTMzMjUyOTIv0gGKAWh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvZnJhdWQtb2YtZm91ci1hbmQtYS1oYWxmLWNyb3Jlcy1ieS1wcmV0ZW5kaW5nLXRvLWdpdmUtY2hlYXAtZmxhdHMtbXVtYmFpLXByaW50LW5ld3MtYW15LTk1LTItMzMyNTI5Mi9saXRlLw?oc=5