मुंबई बातम्या

कशेडी घाटात दरड कोसळली, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प – Times Now Marathi

कशेडी घाटात दरड कोसळली, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प&  | & फोटो सौजन्य:&nbspRepresentative Image

थोडं पण कामाचं

  • कशेडी घाटात दरड कोसळली, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
  • दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प
  • पोलादपूर पोलीस आणि एल अँड टी कंपनीची टीम घटनास्थळी दाखल

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७) कशेडी घाटात दरड कोसळली (landslide in kashedi on mumbai goa highway). पोलादपूर तालुक्यात धामणदेवी गावाच्या हद्दीत ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. 

पोलादपूर पोलीस आणि एल अँड टी कंपनीची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. वाहतूक पूर्ववत होण्यास सकाळ होण्याची शक्यता आहे. 

अभियंत्यांकडून परवानगी मिळेपर्यंत कशेडी घाटातील वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती पोलादपूर पोलिसांनी दिली. वाहतूक ठप्प झाल्यामुळे महामार्गावरुन प्रवास करत असलेल्यांची गैरसोय होणार आहे. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहतूक बंद करुन दरड उपसण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलादपूर पोलिसांनी दिली. 

महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागाने अधिकृत ट्विटर हँडलवरुन कशेडी घाटात दरड कोसळल्याची तसेच महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असल्याची माहिती दिली आहे. कोरोना संकटामुळे नेहमीपेक्षा वाहतुकीचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने कशेडी घाटातून नियमित प्रवास करणारे प्रवासी आहेत. वाहतूक ठप्प झाल्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कुठे आहे कशेडी घाट?

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी गाव आहे. या गावाच्या नावावरुन ओळखला जाणारा कशेडी घाट पोलादपूरजवळ महाड ते खेड या पट्ट्यात येतो. कशेडी घाट हा जवळपास ७.२ किलोमीटरचा रस्ता आहे. प्रवासाच्या दृष्टीने अतिशय कठीण असा हा घाट आहे. मुंबई-गोवा-कोच्ची महामार्गावर हा घाट आहे.

सततच्या पावसामुळे दरड कोसळली

मागील दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे दरडी कोसळण्यास सुरवात झाली आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी  सकाळी  विन्हेरे नातू मार्गावर दरड कोसळली होती. त्यामुळे महाड कडून खेडकडे जाणारा पर्यायी मार्ग बंद झाला होता. दरडीचे ढिगारे हटवून तो मार्ग मोकळा करण्यात आला. गुरुवारी रात्री मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात पोलादपूर जवळ भली मोठी दरड कोसळली, त्यामुळे मुंबईकडे येणारी आणि गोव्याकडे जाणारी वाहतूक पुर्ण पणे बंद झाली. दरड उपसण्याचे, ढिगारे हटवण्याचे काम सुरू आहे. कुंडलिका नदीने सलग दुसऱ्या दिवशी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातमीची भावकी

अपघातप्रवण क्षेत्र आहे कशेडी घाट

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट हे अपघातप्रवण क्षेत्र आहे. या  भागातून जाताना चालकांना वाहनाचा स्पीड नियंत्रणात ठेवण्याची सूचना केली जाते. अशा धोकादायक भागात दरड कोसळल्यामुळे घाटातली वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/sindhudurg-news/article/landslide-in-kashedi-on-mumbai-goa-highway/302172