मुंबई बातम्या

मुंबई महापालिका : नारायण राणे प्रचारात उतरल्यानं भाजपला फायदा होईल की नुकसान? – BBC News मराठी

फोटो स्रोत, Twitter

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला 19 ऑगस्टपासून मुंबईतून सुरुवात झाली. 19 आणि 20 ऑगस्टला नारायण राणे यांनी मुंबई शहर आणि उपनगरात दौरा केला. यादरम्यान नारायण राणे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला हे स्पष्ट आहे.

नारायण राणे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, “जनआशीर्वाद यात्रेला इतका प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा नारळ फोडला नाही तर तो आपोआपच फुटला आहे.”

शिवसेनेचा प्रभाव असलेल्या अनेक मतदारसंघात नारायण राणे यांनी दौरा केला. विशेष म्हणजे यात्रेच्या पहिल्याच दिवशी राणे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाऊन अभिवादन केलं. त्यामुळे शिवसेना विरूद्ध नारायण राणे यांच्यामधला राजकीय तणाव अधिकच वाढलेला दिसला.

गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे.

नारायण राणे आणि शिवसेनेचा संघर्ष सर्वज्ञात आहे. त्यामुळे भाजपकडून नारायण राणे हे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावणार हे निश्चित झाले आहे. पण नारायण राणेंना प्रचारात उतरवल्यानंतर भाजपला फायदा होईल की नुकसान? याबाबतचा हा आढावा.

नारायण राणेंचा मुंबईत किती प्रभाव आहे?

“येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता परिवर्तन करायचं आहे. त्यासाठी मी मुंबईभर फिरणार आहे. कारण गेल्या 32 वर्षांत मुंबईचा नाही तर फक्त मातोश्रीचा विकास झाला आहे,” असं नारायण राणे यांनी भाषणात म्हटलं. पण फक्त शिवसेनेवर टीका करून महापालिका निवडणुकीत यश मिळवणं शक्य नसल्याचं विश्लेषक सांगतात.

नारायण राणे देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

नारायण राणे हे वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवसेनेत सक्रिय होते. शिवसेनेत त्यांच्या आक्रमकतेमुळे चेंबूरचं शाखाप्रमुख पद त्यांना देण्यात आलं. त्यानंतर ते चेंबूरमधून मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले.

1985-1990 च्या काळात नगरसेवक असताना नारायण राणे बेस्टचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी कोकणात आपलं प्रस्थ वाढवलं. त्यानंतर नारायण राणे हे तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी मुख्यमंत्रिपद, विरोधी पक्षनेते पद आणि अनेक मंत्रिपदं सांभाळली आहेत.

चेंबूर, सायनच्या काही भागात राणेंचे कार्यकर्ते असले तरी फक्त मुंबईभोवती असलेलं राजकारण सोडून राणेंना दोन दशकांचा काळ उलटला आहे.

2015 साली शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत नारायण राणे यांनी मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला आव्हान दिलं होतं. वांद्रे पूर्वमधून तृप्ती सावंत विरूद्ध नारायण राणे अशी लढत झाली. पण त्यात नारायण राणे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर नारायण राणे यांनी निवडणूक लढविली नाही. ते काँग्रेसकडून विधानपरिषदेवर निवडून गेले. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभा खासदार केले. आता ते केंद्रीय मंत्री झाले आहेत.

तर भाजपला फायदा होईल?

2017 साली राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. पण मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे लढली. त्यात शिवसेनेला 94 तर भाजपला 83 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपच्या जागांमध्ये कमालीची वाढ झाली होती. शिवसेना सत्तेत असली तरी भाजपच्या जागा वाढणं हा शिवसेनेसाठी धक्का मानला जात होता.

मागच्या पाच वर्षांत राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. त्यामुळे यावेळी नारायण राणे यांना महापालिका निवडणुकीत आतापासून उतरवण्यामागे भाजपची काय रणनीती असेल?

ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात, “भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस सोडले तर मोठे चेहरे कमी आहेत. जे मोठे नेते आहेत, त्यांचं मुंबईत तितकासा प्रभाव नाही. नारायण राणे हा लोकांसाठी ओळखीचा आणि मोठा चेहरा आहे. त्यात शिवसेना आणि नारायण राणे हा संघर्ष आहे. नारायण राणे यांचा मधल्या काळातला निवडणुकांचा आलेख जरी घसरलेला असला तरी त्यांची आक्रमकता कायम आहे. त्यामुळे सध्या निवडणुकीच्या वातावरण निर्मितीसाठी नारायण राणेंचा भाजपला तात्पुरता फायदा तर निश्चितपणे होईल. मतांमध्ये त्याचं परिवर्तन होईल की नाही हे निवडणुकांनंतरच कळेल.”

नारायण राणे

फोटो स्रोत, Getty Images

नारायण राणे हे शिवसेना प्रभावी मतदारसंघात फिरतायेत. शिवसेनेचा मूळ कोकणी मतदार भाजपकडे वळवण्याचा हा प्रयत्न असू शकतो.

ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, “मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ‘मराठी माणूस’ आणि त्याचे प्रश्न हा मुद्दा केंद्रस्थानी असतो. मराठी माणसाची कैवारी म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच मराठी माणूस… हे वर्षानुवर्षाचं समीकरण आहे. ते आतापर्यंत कोणालाही तोडता आलेलं नाही. मागच्या निवडणुकीत भाजपने जरी मोठा आकडा गाठला असला तरी मराठी मतदारांना त्यांना शिवसेनेपासून तितकसं तोडण्यात यश आलं. भाजपला हे मुंबईतील अमराठी मतदारांवर अवलंबून राहावं लागलं होतं.”

अभय देशपांडे पुढे म्हणतात, “मुंबईत राहणारा पण मूळचा मराठी आणि कोकणी माणूस हा शिवसेनेचा निष्ठावंत मतदार राहिलेला आहे. हे इतक्या वर्षाचं समीकरण राणेंच्या माध्यमातून तोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जर ते समीकरण तोडण्यात भाजपला यश आलं तर काही प्रमाणात भाजपच्या जागा निश्चित वाढतील”

शिवसेना विरूद्ध नारायण राणे संघर्ष

शिवसेनेत 39 वर्षे काम करून 2005 साली नारायण राणे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून शिवसेना विरूद्ध नारायण राणे हा संघर्ष सुरू झाला.

नारायण राणे यांनी कायम उद्धव ठाकरेंवर टीका केली. शिवसैनिकांनीही त्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासघात करणारा नेता अशी प्रतिमा शिवेसेनेत तयार झाली. तो संघर्ष इतक्या वर्षानंतर आजही कायम आहे.

ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, “शिवसेना सोडून गेलेले नेते विरूद्ध शिवसैनिक असा संघर्ष कायम राहिलेला आहे. पण नारायण राणेंच्या बाबतीत हा संघर्ष अधिक टोकाचा राहिला आहे. याचं कारणं नारायण राणे आणि त्यांची मुलं यांच्या टीकेच्या केंद्रस्थानी ठाकरे कुटुंब असतं. पण जर हा संघर्ष आगामी महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेनेही पेटवला तर भाजपला नुकसान सहन करावं लागेल आणि शिवसेनेला फायदा होईल. कदाचित हे नारायण राणे यांनाही माहिती असल्यामुळे त्यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या पहिल्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. मी उद्धव ठाकरेंचा विरोधक असलो तरी बाळासाहेब ठाकरेंच्याबाबत आजही मनात आदर आहे, हा राजकीय संदेश त्यातून दिला गेला. यातून मराठी मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून आला”

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

विश्वासघात करणं, दिलेला शब्द न पाळणं या भावनिक मुद्यांवर शिवसेनेचं बरचसं राजकारण अवलंबून असतं. या निवडणुकीतही हे भावनिक मुद्दे समोर येण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी सांगतात, “नारायण राणेंनी बाळासाहेबांचा विश्वासघात केला हा राग शिवसैनिकांच्या मनात आजही आहे किंवा त्यांची प्रतिमा तशी तयार झालेली आहे. ज्यावेळी विश्वासघाताचा मुद्दा येतो तेव्हा शिवसैनिक अधिक एकजुटीने त्याला प्रत्युत्तर देतात हे आतापर्यंतचं चित्र आहे. त्यामुळे जर भाजपच्या राणे कार्डामुळे विखुरलेली शिवसेना एकजूट झाली तर त्यातून भाजपचं नुकसानही होऊ शकतं.”

शिवसेनेची भूमिका महत्त्वाची?

काही वर्षांपासून शिवसेनेने राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर न देण्याची रणनीती आखली आहे. पण जर निवडणुकीत हा संघर्ष पेटला तर शिवसेनेनेची काय भूमिका असेल हे महत्वाचे आहे.

लोकमतचे सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात, “नारायण राणे यांचा शिवसेनेला उचकवण्याचा प्रयत्न आहे. जर शिवसेनेने राणेंच्या टीकेवर संयमाची भूमिका घेतली तर राणेंना फार प्रसिद्धी मिळणार नाही आणि जर त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं तर राणे त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होतील. त्याचा फायदा भाजपला होईल. पण हल्ली प्रचाराची पातळी घसरत चालली आहे. या निवडणुकीत ही किती घसरते यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

‘सोपी गोष्ट’ आणि ‘3 गोष्टी’ हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

Source: https://www.bbc.com/marathi/india-58282883